देवगड तालुक्यात अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे उत्साहात विसर्जन

21

 

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यात अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे उत्साहात विसर्जन

कुणकेश्वर समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी
“गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या” या जल्लोषात देवगड तालुक्यातील अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील विविध गावांमध्ये भव्य मिरवणुका, ढोल-ताशांचे निनाद, डीजेच्या तालावर थिरकणारे युवक, तर महिलांच्या लेझीम तालावर सजलेले पारंपरिक ठेका अशा उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
शिरगाव येथील मानाच्या सार्वजनिक गणपतीची विसर्जन मिरवणूक दिमाखात पार पडली. कुणकेश्वर येथील नाभिक समाज बांधवांचा व तेली समाज बांधवांचा गणपतीही भक्तिरसात न्हालेल्या जल्लोषात विसर्जन करण्यात आला. महिलावर्गाने पारंपरिक पोशाखात लेझीम व ढोल तालावर ठेका धरून मिरवणुक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली होती. गणेश विसर्जनासाठी जाताना आपल्या मिरवणुकीमुळे कुठल्याही वाहनाला अडथळा होणार नाही याची दक्षता प्रत्येक गणेश भक्त घेत होते आणि वाट मोकळी करून होते.
तालुक्यातील शिरगाव, मिठबाव, देवगड, पडेल, विजयदुर्ग,बापर्डे , कुणकेश्वर, तांबळडेग,मुणगे , तिर्लोट,हिंदळे ,जामसंडे, तळेबाजार, किंजवडे तसेच तालुक्यातील इतर पंचक्रोशीतील गावागावातील गणेश विसर्जन ठिकाणी सार्वजनिक मंडळ, सार्वजनिक कुटुंब,घरगुती गणपतींचे विसर्जन त्या त्या स्थळावर भक्तीगीत, मंत्रोच्चार आणि भावपूर्ण जयघोषात पार पडले. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” च्या घोषात श्रद्धाळूंनी बाप्पांना जड अंतःकरणाने निरोप दिला.
कोकणातील प्रमुख सण म्हणून गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. मुंबईसह देश-विदेशातील असंख्य चाकरमानी या सणासाठी गावी दाखल होतात. गणेश भक्तांच्या होणाऱ्या आगमनामुळे गणेशोत्सव कालावधी साखरमानांनी कोकण फुलून जाते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची परंपरा आजही सर्वत्र शिस्तबद्ध पद्धतीने जोपासली जात आहे.घराघरांतून बाप्पाचे आगमन होताच जणू घराचेच मंदिर झाले असे वातावरण निर्माण होते. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी या उत्सवात सहभागी होऊन ऐक्य, भक्ती व आनंदाचा संदेश दिला.
अकरा दिवसांच्या विसर्जन सोहळ्यानंतर संपूर्ण परिसरात भाविकांच्या डोळ्यांत पाणी तर ओठांवर एकच जल्लोषी उद्गार — “गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!”