मुंबई- विजयदुर्ग रो-रो सेवा चाचणी यशस्वी – सिंधुदुर्गच्या प्रगतीला नवे पंख
कोकणवासियांच्या दीर्घ प्रतीक्षेला आज खऱ्या अर्थाने पूर्णविराम मिळाला. तब्बल ३८ ते ४० वर्षांच्या खंडानंतर मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले. एमटूएम फेरीज कंपनीच्या “एमटूएम प्रिन्सेस” या प्रवासी बोटीची यशस्वी चाचणी बुधवारी विजयदुर्ग बंदरात घेण्यात आली. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता बोट विजयदुर्ग बंदरात दाखल होताच ढोल-ताशांच्या गजरात, टाळ्यांच्या कडकडाटात विजयदुर्ग पंचक्रोशीतील उपस्थित ग्रामस्थांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठी गर्दी बंदर परिसरात उसळली होती.
बुधवारी या बोटीत चारचाकी वाहने लोड करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पाऊण तासाच्या प्राथमिक चाचणीनंतर बोट यशस्वी ठरली व सकाळी ९.१५ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
विजयदुर्ग बंदरातील नव्याने उभारण्यात आलेल्या जेटीवर ही पहिलीच बोट लागली. मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार नितेश राणे यांनी ही सेवा लवकरच कायमस्वरूपी सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.त्यांनी सांगितले की, “विजयदुर्ग बंदरातील जलवाहतूक प्रकल्प पुढील काही दिवसांत पूर्णतः ऍक्टिव्ह मोडवर येईल. ही रो-रो सेवा कोकणासाठी गेमचेंजर ठरणार असून पर्यटन, व्यापार व रोजगाराला नवी चालना मिळेल.”
या प्रसंगी बोटीचे कॅप्टन मृत्युंजय सिंग यांचा जि प माजी उपाध्यक्ष आरिफ बगदादी,संजय बोंबडी यांनी सत्कार केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी बाळ खडपे, मंडळ अध्यक्ष बंडू नारकर, माजी पंचायत समिती सदस्या शोभा कदम, संजना आळवे, सचिव प्रदीप साखरकर, अंकुश ठुकरूल, ग्रेसिस फर्नांडिस, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, ग्रामपंचायत सदस्य दिनेश जावकर, मॅरिटाईन बोर्ड मुंबईचे कॅप्टन संदीप भुजबळ, बंदर अधिकारी उमेश महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुन्हा जलवाहतूक सुरू झाल्याने केवळ विजयदुर्गच नव्हे तर देवगड तालुकवासीयांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.या बोटीसेवेमुळे कोकणातील मुंबई-गाव दळणवळण अधिक सोपे होईल तसेच विजयदुर्गला जल पर्यटनाचे विशेष महत्त्व प्राप्त होईल. जवळपास चार दशकांनंतर पुन्हा एकदा विजयदुर्गमध्ये रो-रो सेवा दाखल झाल्याने इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून, सिंधुदुर्गच्या विकासाला वेग मिळणार आहे.