नाद येथील नेपाळी खून प्रकरणी पती प्रेम बिष्ट याला ३० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
नाद येथील ‘बेब्याचा सडा’ या भागातील कलम बागेत एका खोलीमध्ये पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला तिचा पती प्रेम बहादूर बिष्ट या संशयित नेपाळी कामगाराला देवगड न्यायालयाने ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रेम बिष्ट व त्याची पत्नी सुनीता हे दोघे नाद येथील आंबा बागायतदार यशवंत रमेश सावंत यांच्या कलम बागेत मजुरीचे काम करीत होते. बागेतच एका खोलीमध्ये हे दाम्पत्य आपल्या मुलांसमवेत वास्तव्यास होते. २६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास संशयित प्रेम याचा पत्नीशी वाद झाला व यात त्याने लाकडी दांड्याने पत्नीला मारहाण करून तिचा खून केला. या घटनेची फिर्याद बागेचे मॅनेजर मोहन नारायण मोरे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली होती. या फिर्यादीनुसार संशयित प्रेम बिष्ट याला देवगड पोलिसांनी अटक करून गुरुवारी त्याला देवगड न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने संशयिताला ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गचे अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.