दोडामार्ग येथे १९ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

44

 

दोडामार्ग (प्रतिनिधी)

दोडामार्ग येथे १९ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

बोडदे गावठणवाडी येथे एका १९ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. राज सुनील गवस असे युवकाचे नाव असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. ऐन गणेशोत्सवात या युवकाने केलेल्या आत्महत्येबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
बोडदे गावठणवाडी येथे राज हा आपल्या आई, वडील व बहीण यांच्यासोबत रहायचा. मागील काही दिवसांपासून तो गोवा येथील खासगी कंपनीमध्ये कामाला जात होता. गणेशोत्सव असल्याने चतुर्थीच्या आदल्या दिवशी मंगळवारी आपल्या घरी आला होता. बुधवारी कुटुंबासोबत गणेशपूजन केले. रात्री अकरा वाजेपर्यंत भजन केले. त्यानंतल सगळे झोपी गेले व सकाळी उठल्यावर गुरुवारी गणेशचतुर्थीचा दुसरा दिवस असल्याने घरातील सर्वजण कामात व्यस्त व्यस्त होते. राजसुद्धा सगळ्यांसोबत उठला होता. थोड्या वेळाने तो आपल्याला झोप येते म्हणून खोलीत पुन्हा झोपायला गेला. बराच वेळ उलटूनही तो न उठल्याने घरातील मंडळी त्याला हाक मारू लागले, पण तो उठून आला नाही. म्हणून अखेर दरवाजा तोडून खोलीत गेले असता खोलीतील पंख्याला फास अडकून लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच स्थितीत खाली उतरवून साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजु शकले नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह कुटूंबियाच्या ताब्यात देण्यात आला. आरोग्य केंद्रात बोडदे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. राज याने अचानकपणे केलेल्या आत्महत्येमुळे आईवडिलांना मोठा धक्का बसला.एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ऐन गणेशोत्सवात बोडदे गावांवर शोककळा पसरली. ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक, नातेवाईक यांच्याकडून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात होती.
प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे दोडामार्ग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, उपनिरीक्षक श्री नाईक, पोलीस श्री. देसाई हे दाखल झाले होते. बोडदे येथे घटनास्थळी जात रीतसर पंचनामा केला व पुढील तपास सुरू आहे. राज याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.