कुडाळ : तालुक्यात गुरूवारी दिड दिवसांच्या श्री गणेश मुर्तींचे विसर्जन 

20

 

कुडाळ (प्रतिनिधी)

कुडाळ : तालुक्यात गुरूवारी दिड दिवसांच्या श्री गणेश मुर्तींचे विसर्जन 
 

         गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया..च्या जयघोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गुरूवारी सायंकाळी कुडाळ तालुक्यातील दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. कुडाळ शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी गेले दीड दिवस मनोभावे सेवा केलेल्या श्री गणेश मुर्तींना निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी कुडाळ मध्ये प्रशासनही सज्ज झाले आहे. न.पं. प्रशासनाकडून भंगसाळ नदी किनारी श्रींच्या मुर्ती विसर्जनासाठी छोटेखानी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच भंगसाळ नदीपात्रात मगरींचा वावर असल्याने गणेश विसर्जन वेळी कुडाळ वनविभागामार्फत जलद कृती दल तैनात ठेवण्यात आले होते.
      सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. दीड, पाच, सात, नऊ, अकरा दिवस मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होतो. तर काही ठिकाणी सतरा, एकवीस, पंचवीस दिवस श्री गणेशाचे पूजन करण्यात येते. सार्वजनिक गणेशोत्सवही दिमाखात साजरा होतो. बुधवारपासून श्री गणेश चतुर्थीला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. कुडाळ तालुक्यात सार्वजनिक गणपतींसह घरोघरी श्री गणेश मुर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले आहे. गेले दीड दिवस मनोभावे पूजन केलेल्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे गुरूवारी सायंकाळी विसर्जन करण्यात आले. नदी, तलाव, ओहोळ आदी ठिकठिकाणी गणेश मुर्तींचे भक्तीमय वातावरण विसर्जन करण्यात आले. कुडाळ शहरातील भंगसाळ नदीसह नऊ गणेश घाट ठिकाणी श्रींना निरोप देण्यात आला. या ठिकाणी न.पं. प्रशासनाकडून भाविकांच्या सेवेसाठी मंडप उभारण्यात आले आहेत. बाप्पाचा जयघोष सुरू ठेवण्यासाठी लाऊड स्पीकरची व्यवस्था करण्यात आली होती.
निर्माल्य गोळा करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. न.पं. कडून भंगसाळ नदी गणेश घाट जवळ पर्यावरणपूरक कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच भंगसाळ नदीपात्रात मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे गणेश विसर्जन वेळी दक्षतेने आवाहन वनविभागाने गणेशभक्तांना केले आहे. तसेच जलद कृती दलही तैनात ठेवण्यात आले होते. न.पं. कर्मचारी गणेश घाट ठिकाणी तैनात होते. शहरात पोलिस प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम स्वतः लक्ष ठेवून होते.
महापुरुष मंदिर जवळील गणेश घाटाकडे जाणा-या रस्त्यावर पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. न.पं. कडून अग्निशमन बंबाच्या सहाय्याने पाणी मारून रस्ता स्वच्छ करून देण्यात आला. बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळल्याने भंगसाळ नदीला पूर आला होता. गुरूवारी पूराचे पाणी ओसरत होते. सायंकाळी पाण्याचा प्रवाह मोठा होता. त्यामुळे जवळच गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात येत होते.