मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात गोकुळाष्टमी हरिनाम सप्ताह उत्सव दिमाखात

452

 

देवगड (प्रतिनिधी)

 मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात गोकुळाष्टमी हरिनाम सप्ताह उत्सव दिमाखात

कोकणातील पारंपरिक संस्कृती, भक्तीचा संगम आणि गावागावच्या ऐक्याचे दर्शन घडवणारा एक ऐतिहासिक क्षण मिठबाव ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात यावर्षी अनुभवायला मिळाला. तब्बल तीनशे वर्षांनंतर या मंदिरातील खंडित असलेला वार्षिक उत्सव पुन्हा सुरू झाला .आणि त्यामुळे आज गोकुळाष्टमीच्या दिवशी सात प्रहर हरिनाम सप्ताह उत्सव साजरा करण्याची परंपरा यावर्षीपासून प्रारंभ झाली आहे. १५ व १६ ऑगस्ट रोजी हा दोन दिवसीय सोहळा अत्यंत मोठ्या दिमाखात, भाविकांच्या उत्साहात पार पडला.

इतक्या वर्षांनी होणाऱ्या या उत्सवासाठी मिठबाव, तांबळडेग आणि कातवण या तिन्ही गावातील गावघर रयत एकदिलाने पुढे आली होती. मंदिरातील कार्यक्रमांसाठी गावागावचे तरुण, महिला व वयोवृद्धांनी हिरहिरीने सहभाग घेतला. उत्सवाच्या तयारीत आणि आयोजनात दिसलेला एकोपा हाच या सोहळ्याचा मोठा गाभा ठरला.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उत्सवाचे यजमान जमेदार नाडकर्णी यांच्या हस्ते श्री देव विठ्ठल-रखुमाई,तसेच घटिका व वाद्य विणा यांची पूजा झाली. त्यानंतर वाद्यविना भंडारी समाज बांधवांकडे सुपूर्द करत हरिनाम उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. यानंतर सात प्रहरांचा सप्ताह सुरू झाला. नेमून दिलेल्या वेळेत तिन्ही गावची रयत शिस्तबद्ध पद्धतीने आपापले मेळे सादर करत होती. वातावरण भक्तिभावाने दुमदुमून गेले होते.

सायंकाळी उत्सव यजमान जमेदार नाडकर्णी यांच्या निवासस्थानाहून ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जयजयकाराच्या गजरात श्रीकृष्ण मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. ही मूर्ती मोठ्या भक्तिभावाने श्री देव रामेश्वर मंदिरात आणण्यात आली. गोकुळाष्टमी परंपरेनुसार श्रीकृष्ण मूर्तीचे विधिवत पूजन,आरती पार पडली आणि भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
रात्री बाराच्या सुमारास वार्षिक परंपरेनुसार श्रीकृष्ण बालमूर्तीला पाळण्यात ठेवून पाळणा गीतांच्या गजरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला.या प्रसंगी गावातील पुरुष व महिलांनी मंडळींनी भक्तिगीतांचा निनाद केला. त्यानंतर गावरयत मधील काही बाळगोपाळांनी तयार केलेल्या दिंडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि टाळ-मृदंगाच्या तालावर भाविकांनी हरिनामाचा जयघोष केला. वातावरणात एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.

१६ ऑगस्टच्या पहाटे पाच वाजता मंदिरात काकड आरती पार पडली. सकाळी दहा नंतर हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमास सुरुवात झाली. विधीवत पूजा झाल्यानंतर दुपारी बारा वाजता हरिनाम उत्सवाची सांगता झाली.सांगता झाल्यानंतर गोकुळाष्टमीचा पारंपरिक दहीकाला उत्सव रंगला. गावातील लहान थोरांनी पारंपरिक खेळ खेळून आनंद लुटला. सर्व उपस्थित गोपाळांना दही वाटण्यात आले. त्यानंतर मंदिरात खास बांधलेली दहीहंडी बाळगोपाळांनी फोडली. या क्षणाने उत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला.मंदिरातील दहीहंडी कार्यक्रम आटपल्यानंतर वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आणि जयजयकाराच्या घोषणांतून श्रीकृष्ण मूर्तीचे विसर्जन मिठबाव अन्नपूर्णा नदीत करण्यात आले. या निरोप सोहळ्यात गावकरी भावनाविवश झाले.
तीनशे वर्षांनी पुन्हा एकदा हा सोहळा अनुभवायला मिळत असल्याचा गावघर रयतींना अत्यानंद झाला होता. पुरुष, महिला आणि लहानग्या गोपाळांनी दहीकाला खेळात सहभाग घेतला. भाविकांनी एकच भावना व्यक्त केली. “पिढ्यानपिढ्या सांगितला जाणारा हा उत्सव आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळतोय, हे आमच्यासाठी भाग्य आहे.”