देवगड (प्रतिनिधी)
उमाबाई बर्वे ग्रंथालयात ग्रंथपाल दिन ग्रंथप्रदर्शनाने साजरा
येथील उमाबाई बर्वे लायब्ररीमध्ये भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक ‘डॉ. एस. आर. रंगनाथन’ यांचा जन्मदिन हा ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रंथालयाने खरेदी केलेल्या ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन शेठ म. ग. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण खडपकर यांनी दीपप्रज्वलनाने केले. यावेळी त्यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरूदेव परूळेकर यांनी श्री. खडपकर यांचे स्वागत केले. तसेच श्री खडपकर यांची शेठ म. ग. हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा ग्रंथालयातर्फे सत्कार केला.
यावेळी श्री खडपकर यांनी डॉ. रंगनाथन हे भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत. देशात ग्रंथालय व माहितीशास्त्राची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली. त्यांच्या ग्रंथालयशास्त्राच्या पंचसूत्रीप्रमाणे देशातील ग्रंथालयांचे व्यवस्थापन होत आहे. भारतीय ग्रंथालय चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा असून वाचक चळवळ वृद्धिंगत
करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान मोठे आहे. बर्वे ग्रंथालय विविध उपक्रमाद्वारे वाचकांना उत्तम सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले. श्री खडपकर यांनी ‘ग्रंथपाल’ दिनानिमित्त ग्रंथालयाच्या वाचक व सर्व सेवकांना शुभेच्छा दिल्या.
ग्रंथालयाचे सचिव श्री सीताराम पाटील यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवन चरित्राचा
आढावा घेतला. श्री सागर कर्णिक यांनी ग्रंथपाल दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. परूळेकर यांनी ग्रंथालयाच्या सर्व वाचकांनी जास्तीतजास्त या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. ग्रंथपाल श्री प्रशांत बांदकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व श्री पाटील यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानून ग्रंथप्रदर्शन दि. १९ ऑगस्ट पर्यंत सर्वांसाठी खुले आहे असे सांगितले. यावेळी ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सौ. उत्तरा जोशी, लक्ष्मण लोंढे, मिसबाह गिरकर, प्रकाश पंडित व वाचकवर्ग उपस्थित होते.





