तिसऱ्या श्रावण सोमवारी कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दींचा उच्चांक

25

 

देवगड (प्रतिनिधी)

तिसऱ्या श्रावण सोमवारी कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दींचा उच्चांक

 

सहाय्यक धर्मदाय आयुक्त अवंतिका कुलकर्णी, ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते झाली पहिली पूजा

दक्षिण कोकणची काशी म्हणून जग प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर मंदिर येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारच्या निमित्ताने मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात “ॐ नम: शिवाय” गजरात पहाटेपासूनच मंदिर परिसर गजबजून गेलेला पहायला मिळाला. पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या पवित्र दिवशी पहाटे ५ वाजता सहाय्यक धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग श्रीमती अवंतिका कुलकर्णी, तसेच कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांना पहिल्या पूजेचा मान देण्यात आला. पूजा विधि संपन्न झाल्यानंतर सकाळी सहा वाजले पासून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. त्यानंतर दिवसभर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच कोकणातील इतर भागांमधून हजारो शिवभक्त दर्शनासाठी आले होते. भाविकांच्या सोयीसाठी देवगड आणि कणकवली येथून जादा गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी अडीच वाजेपर्यंत मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तसेच सामाजिक क्षेत्रातील मंडळी यांनी देखील कुणकेश्वर मंदिरात हजेरी लावून शंभू महादेवाचे दर्शन घेतले. भाविकांच्या सुव्यवस्थेसाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व देवगड पोलीस स्टेशन यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणत्याही प्रकारची अडचण किंवा गैरसोय न होण्यासाठी स्वच्छता, वाहतूक व मार्गदर्शनासाठी स्वयंसेवकही सक्रिय होते.
यावर्षी श्रावण महिन्यातील तिन्ही सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी श्री क्षेत्र कुणकेश्वर तीर्थक्षेत्री पाहायला मिळाली. आतापर्यंतच्या कुणकेश्वर श्रावण सोमवारी येणारे भाविक खाजगी गाड्या घेऊनच येत होते मात्र यावेळी कोल्हापूर येथूनही एसटीची सोय उपलब्ध करून दिल्याने सांगली कोल्हापूर, भागातील भाविकांची वर्दळ कुणकेश्वर येथे वाढली असल्याने समाधान व्यक्त करत येणाऱ्या सर्व भाविकांचे पर्यटकांचे, पोलीस यंत्रणा ,एसटी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा या सर्वांचे कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आभार व्यक्त केले.