पुणे : पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने गाठलं होत. त्यातून ते सुखरूप सुटतील अस वाटत असताना पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज अखेर त्यांच उपचारादरम्यान निधन झालं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “गेले अनेक वर्ष लक्ष्मण जगताप यांच्यावर उपचार सुरु होते. दिर्घ आजाराने आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांची लोकप्रियता होती. आजारी असताना देखील विधीमंडळात निवडणुकीसाठी ते व्हिलचेअरवर आले होते.”





