गावात नवचैतन्य निर्माण करणारा मिठबाव भावई देवीचा वल्ली वल्ली भावय् उत्सव उत्साहात !

1296

 

देवगड (प्रतिनिधी)

गावात नवचैतन्य निर्माण करणारा मिठबाव भावई देवीचा वल्ली वल्ली भावय् उत्सव उत्साहात !

सुमारे 300 वर्षांनी मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात श्री देवी (भावई) गजांत लक्ष्मीचा उत्सव झाला साजरा

कोकणातील पारंपरिक धार्मिक परंपरा, समृद्ध सांस्कृतिक वारसा परशुरामाच्या भूमित जपणारी प्राचीन मंदिरे देवालये परशुरामाच्या भूमितीत जागर आजही जागृत ठेवून आहेत. म्हणूनच कोकणची एक वेगळी ओळख बनली आहे. या पारंपरिक सण उत्सवाच्या निमित्ताने कोकणी माणसाने आपली नाळ आपल्या भूमीशी जोडलेली आहे.सुमारे तीनशे वर्षांपूर्वी स्थगित असलेल्या मिठबाव श्री देव रामेश्वराच्या वार्षिक उत्सवाला प्रारंभ झाला आणि गावात एक नवचैतन्य निर्माण झालं. आज त्याच उत्सवाचाच एक भाग असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिर येथील श्री देवी (भावई) गजांत लक्ष्मी उत्सव आज मोठ्या उत्साहात , भक्तिभावात पार पडला.

 

आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता देवी भावईची विधीवत पूजा पांडुरंग घाडी यांच्या हस्ते करण्यात आली. पूजा विधी झाल्यानंतर मंदिरात एकत्रित आरती झाली. मोठ्या संख्येने सुहासिनी देवीची ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. या पारंपरिक विधीमुळे गावात अध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचा सुवास दरवळत होता. ओट्या भरताना महिलांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीचा झरा वाहताना स्पष्ट दिसत होता.उत्सवात विविध पारंपरिक साफड खेळ(दगड खेळविणे),नारळ लढविणे,खो-खो,कबड्डी,यासह चिखल मेळा खेळ आदींचे उत्साहात सादरीकरण यामुळे वातावरणात ऊर्जा आणि उत्साह संचारलेला दिसून आला. गावातील तरुणाई आणि लहान मुलांनी यात हिरीरीने भाग घेतला.

 

शिवकळेच्या आज्ञेप्रमाणे हा उत्सव मानकरी आणि गाव घर रयतेच्या सामूहिक सहभागाने पार पाडला. पारंपरिक गीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदमय झाले.पारंपरिक उत्सवाची खासियत म्हणजे दहिभाताचा प्रसादाचे वाटप करण्यात आले. 
300 वर्षांनी उत्सवाचे पुनरागमन इतिहास साक्षात
विशेष म्हणजे सुमारे 300 वर्षांनी मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिराचा पारंपरिक वार्षिक उत्सव पुन्हा सुरू करण्यात आला.मिठबाव, तांबळडेग कातवण गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिरातील या उत्सवाचे सर्व बारा पाच मानकरी, सेवेकरी गाव घर रयत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार झाले.या उत्सवाच्या निमित्ताने पूर्वपारंपारिक सांस्कृतिक वारशाचा सुंदर जागर केला. या उत्सवाने नव्या पिढीला पारंपरिक परंपरांचे महत्त्व समजून देण्याची संधी दिली आणि एकत्र येऊन साजरा केलेला उत्सव गावाच्या एकोप्याचा प्रतीक ठरला.
oplus_0