कोकणचा अभिमान ! कुडाळच्या सुमित दाभोलकर यांनी ‘मुंबई पोलिसांचा राजा’ मंडळासाठी साकारला नवा लोगो

14

 

कुडाळ (रोशन केरकर)

कोकणचा अभिमान ! कुडाळच्या सुमित दाभोलकर यांनी ‘मुंबई पोलिसांचा राजा’ मंडळासाठी साकारला नवा लोगो

कोकण ही केवळ निसर्गसंपन्न भूमी नाही, तर ती कला-रत्नांची खाण आहे. येथील कलाकारांनी केवळ कोकणापुरतेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपली खास ओळख निर्माण केली आहे. अशीच एक गौरवास्पद कामगिरी कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार सुमित सुधाकर दाभोलकर यांनी केली आहे.
मुंबईतील वरळी पोलीस कॅम्प परिसरात ‘मुंबई पोलिसांचा राजा’ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रविवार, २७ जुलै २०२५ रोजी मंडळाच्या ७६ व्या वर्षानिमित्त नूतन लोगोचे अनावरण व श्रींचा पाद्यपूजन सोहळा दिमाखात पार पडला. या वर्षी मंडळाच्या बोधचिन्हात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, आणि त्यासाठी सुमित दाभोलकर यांची विशेष निवड करण्यात आली.
सुमित दाभोलकर हे ग्राफिक्स आणि कॅलिग्राफी क्षेत्रातील जाणकार कलाकार असून, त्यांनी आजवर अनेक नामांकित लोगो व अक्षरगणेश तयार केले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात त्यांचे सुलेखनामधून साकारलेले मनाचे श्लोक व धार्मिक कलाकृती विशेष चर्चेत असतात. याआधी त्यांनी कुडाळ येथे ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणेशोत्सव येथे मनाचे श्लोक सुलेखनातून सादर करून सर्वांचे लक्ष वेधले होते.
मुंबईतील या कार्यक्रमावेळी अमित ठाकरे, अभिनेता सुयश टिळक, माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग, सतीश सहानी व जे. एफ. रिबेरो आदी मान्यवर उपस्थित होते. नवीन लोगोचे अनावरण जे. एफ. रिबेरो यांच्या हस्ते, तर सतीश सहानी व एम. एन. सिंग यांच्या हस्ते सुमित दाभोलकर यांचा सत्कार करण्यात आला. ‘मुंबई पोलिसांचा राजा’ या नावामधील “मुं” आणि “पो” ही आद्याक्षरे वापरून सुमित यांनी अत्यंत कल्पकतेने आणि सौंदर्यपूर्ण शैलीत लोगो तयार केला आहे. मंडळाच्या ओळखीला नवी दिशा व प्रेरणा देणारा हा लोगो म्हणून गौरवण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुमित यांच्या कलात्मक विचारांची, सुलेखन सादरीकरणाची आणि सर्जनशीलतेची स्तुती केली.
सुमित यांच्या या कार्याचे पोलीस कॅम्प परिसरात आणि पोलीस बांधवांतून विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या या योगदानामुळे कोकणाच्या सर्जनशीलतेला आणि कुडाळच्या कलाविश्वाला एक वेगळा सन्मान प्राप्त झाला आहे.