पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने कुणकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

301

 

देवगड (स्वप्निल लोके)

 

पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने कुणकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

 

मिठबाव रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना खिचडी वाटप
दक्षिण कोकणची काशी म्हणून जग प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर मंदिर येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या निमित्ताने मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात “ॐ नम: शिवाय” गजरात पहाटेपासूनच मंदिर परिसर गजबजून गेलेला पहायला मिळाला. पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या पवित्र दिवशी पहाटे ५ वाजता कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवलकर आणि मालवण येथील उद्योजक सुरेश नेरुरकर या दोघां उभयतांना पहिल्या पूजेचा मान देण्यात आला. पूजा विधि संपन्न झाल्यानंतर सकाळी सहा वाजले पासून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. त्यानंतर दिवसभर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहिली.

 

श्रावण सोमवार असल्यामुळे अनेक शिवभक्तांचा उपवास असतो.शिवभक्तांची भाविकांची सेवा म्हणून मिठबाव रामेश्वर प्रतिष्ठान अध्यक्ष , मिठबाव सरपंच भाई नरे यांच्यावतीने खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच उद्योजक आनंद शिरवलकर यांच्यावतीने भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले . सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच कोकणातील इतर भागांमधून हजारो शिवभक्त दर्शनासाठी आले होते. भाविकांच्या सोयीसाठी देवगड आणि कणकवली येथून जादा गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी अडीच वाजेपर्यंत मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता .
विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक पदाधिकारी यांनी तसेच देवगड तहसीलदार यांनी देखील कुणकेश्वर मंदिरात हजेरी लावून शंभू महादेवाचे दर्शन घेतले.भाविकांच्या सुव्यवस्थेसाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व देवगड पोलीस स्टेशन यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणत्याही प्रकारची अडचण किंवा गैरसोय न होण्यासाठी स्वच्छता, वाहतूक व मार्गदर्शनासाठी स्वयंसेवकही सक्रिय होते.

 

मुंबईहून आलेले सुप्रसिद्ध भजनी कलाकार सकाळपासूनच मंदिर परिसरात आपली सुरेल भजन सेवा देत होते. त्यांच्या मधुर स्वरांनी मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, श्रावण सोमवारचा उत्सव केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित आहेच . त्याचबरोबर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलेल्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्रावर कॉलेजमधील अनेक तरुणाई देखील या दिवशी मंदिरात दर्शनासाठी व मौजमजेच्या निमित्ताने दाखल होत असते.
पहिला सोमवार कुणकेश्वर मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिभावाने, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला. त्याचबरोबर शिवभक्तांसाठी मिठबाव रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आले या उपक्रमाचे देखील कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कौतुक करत . तसेच सहकार्य करणाऱ्या पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, शिवभक्त, पर्यटक भाविक, व ग्रामस्थ या सर्वांचे आभार कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष एकनाथ तेली यांनी व्यक्त केले.