देवगड / प्रतिनिधी
जनता दरबाराचा हा सिंधुदुर्ग पॅटर्न महाराष्ट्र राज्यासाठी दिशादर्शक राहील – अंकुश जाधव
संविधानिक हितकारिणी महासंघ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथे २६ जुलै रोजी होणारा समाज संवाद आणि तक्रार निवारण मेळावा हा सिंधुदुर्गात प्रथमच होत आहे. एकाच मंचावर जिल्ह्यातील अनुसुचित जातीसाठी अथवा एका विशिष्ट समाजासाठी पालकमंत्र्यांनी जनता दरबार घेणे ही बाब भूषणावह आहे. जनता दरबाराचा हा सिंधुदुर्ग पॅटर्न महाराष्ट्र राज्यासाठी दिशादर्शक राहील, असा आशावाद संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक अंकुश जाधव यांनी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. जाधव बोलत होते. यावेळी महासंघाचे जिल्हा सहकोषाध्यक्ष देवा कदम, जिल्हा सचिव दिलीप वाडेकर (विजयदुर्ग), जिल्हा निमंत्रक चंद्रकांत वालावलकर, देवगड उपाध्यक्ष विश्वनाथ पडेलकर, महिला आघाडीच्या गौतमी कदम आदी उपस्थित होते. श्री. जाधव म्हणाले, संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात या जिल्हयातील राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजघटकांनी एकत्र येऊन संविधानिक हितकारिणी महासंघाची निर्मिती केली आहे.
मागासवर्गीयांचे शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत २६ रोजी दुपारी २ वा. समाज संवाद आणि तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच अशाप्रकारचा जनता दरबार पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एका समाजासाठी त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी भरविला जात आहे. या जनता दरबारात मांडण्यात येणाऱ्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांकडून तात्काळ निर्णय घेण्यात येतील व प्रलंबित राहणाऱ्या प्रश्नांबाबत महासंघ प्रशासनाकडे पाठपुरावा करेल. यातून शासन व प्रशासनासोबत सुसंवाद साधला जाईल.
यावेळी विविध खात्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सांस्कृतिक भवन अशा अनेक विविध मुद्द्यांकडे या जनता दरबारातून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. हा जनता दरबार यशस्वी होण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हे जनता दरबाराचे हे व्यासपीठ निरंतर सुरू राहण्यासाठी पालकमंत्री राणे यांचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.





