मिठबाव येथे २४ जुलै रोजी देसरुड कार्यक्रम ; कार्यक्रमाच्या निमित्ताने तिन्ही गावची गावघररयत येणार एकत्र
कार्यक्रमादरम्यान दोन ते सहा या कालावधीत गावच्या सीमा असणार तात्पुरत्या बंद
मिठबाव तांबळडेग कातवण या तीन गावचे प्रमुख ग्रामदैवत असलेल्या श्री देव रामेश्वराचा वार्षिक गावरहाठी उत्सव सुमारे ३०० वर्ष स्थगितचं होता. शिवकळेच्या हुकूमानुसार श्री देव रामेश्वराची व कुणकेश्वराची शिवतीर्थावर ऐतिहासिक भेट झाली.आणि त्यानंतर स्थगित असलेल्या गाव राठीला नवसंजीवनी प्राप्त झाली.मिठबाव देवस्थान मधील बंद स्थितीत असलेल्या रूढीपरंपरा वार्षिक पूर्वरूढीनुसार चालू करण्यात आल्या.
चैत्र मासातील सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर शिवकळेच्या आज्ञेने कौल प्रसादानंतर सुचित केल्याप्रमाणे श्रावण मासातील महत्त्वाचा देसरुड हा विधी गुरुवार २४ जुलै रोजी संपन्न होणार आहे.हा विधी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार असून या कालावधीत मिठबाव गावच्या सीमा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाबाबत तिन्ही गावघर रयतेचा एकत्रित गावमेळा मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात झाला.त्यानुसार कार्यक्रमाबाबत मिठबाव, तांबळडेग, कातवण गावातील गाव घर रयतेला रिक्षाच्या माध्यमातून स्पीकरद्वारे सूचनाही करण्यात आली आहे. तसेच गाव घर रयतेमधील नागरिकांनी कोणीही आपल्या गावची हद्द सोडू नये आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.