बांदा : प्रतिनिधी
८०२ किमी शक्तीपीठ महामार्ग झाल्यास कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास होणार – माजी खासदार राजू शेट्टी
प्रस्तावित पवनार – पत्रादेवी हा ८०२ किमी शक्तीपीठ महामार्ग झाल्यास कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास होणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची समस्या उद्भवेल. २७ हजार एकर जमीन खरेदी करून ५५ हजार शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणारा हा प्रकल्प आहे. राज्य शासनाला शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे, असे साकडे विरोधी संघर्ष समितीचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी श्री पत्रादेवी चरणी घातले.
स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष, माजी खा. राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र – गोवा सीमेवरील श्री पत्रादेवी देवस्थानला भेट दिली. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी श्री पत्रादेवी चरणी गाऱ्हाणे घालण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत विनाशकारी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून लढा दिला पाहिजे असे स्पष्ट केले.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, माजी आरोग्य सभापती संग्रामसिंग कुपेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेसचे विद्याधर गुरबे, मनसेचे नागेश चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यांनवर, शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मनसे तालुकाध्यक्ष मिलींद सावंत, ग्राम पंच सदस्य साई काणेकर, नंदू नाडकर्णी, ज्ञानेश्वर येडवे, प्रशांत पांगम, संदीप सावंत, शब्बीर मणियार यांच्यासह शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.





