१०० फूट दरीत कोसळला मालवाहू ट्रॅक ; तिलारी घाट येथील घटना

112

 

दोडामार्ग (प्रतिनिधी)

१०० फूट दरीत कोसळला मालवाहू ट्रॅक ; तिलारी घाट येथील घटना

तिलारी घाटातील जयकर पाॅईंट येथील तीव्र उताराच्या वळणावर एक मालवाहू ट्रक थेट १०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात चालक शशी कुमार पी (४० वर्षे, घर नं. १७१, शिमोगा, भद्रावती) व वाहक विजय गुप्ते (३८ वर्षे, मयुरी टॉकीज रोड, चन्नम्मा सर्कल, अंकली, तालुका चिकोडी, कर्नाटक) गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातात ट्रकाचे चार तुकडे झाले आहेत. शनिवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, चालक शशी कुमार पी हे त्यांच्या ताब्यातील आयशर ट्रक घेऊन शनिवारी सकाळी कर्नाटकहून गोवा येथे जात होते. यावेळी त्यांनी तिलारी घाट मार्ग अवलंबला. त्यांच्यासोबत विजय गुप्ते हे देखील होते. घाट उतरत असताना जयकर पॉईंट येथील तीव्र उतारावर चालकाचे ट्रकावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चालकाने बचाव करण्यासाठी ट्रकातून बाहेर उडी मारली, तर विजय हे गाडी बाहेर फेकले गेले. यावेळी चालक एका कठड्यावर आढळून गंभीररीत्या जखमी झाले. तर विजय हे सुद्धा जखमी झाले. ट्रक थेट १०० फूट खोल दरीत कोसळला. अपघाताचे वृत्त वीजघर येथील तपासणी नाक्यावर कर्तव्य बजावत असलेले पोलीस विजय जाधव व किरण आडे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दोघांनीही जखमींना त्यांच्या खासगी गाडीतून चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर वाहक विजय गुप्ते याचा एक हात मनगटातून तुटला आहे. घटनास्थळी मॅगी पाकीटाची प्लास्टिक रोल आढळून आल्याने हा ट्रक गोवा येथे सर्व रोल घेऊन जात असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. या अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की ट्रकाचे केबिन, इंजिन, हौदा व चाके अशा चार विभागात तुकडे झाले.