कणकवली (प्रतिनिधी)
शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे स्मार्ट वीज मीटर न बसविण्याचे अदानी कंपनीला महावितरणचे पत्र
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अदानी स्मार्ट प्रीपेड वीज मीटरची सक्ती करू नये. सर्वसामान्य नागरिकांना हे मीटर परवडणार नाहीत. त्यासाठी आम्ही आंदोलन केले होते त्यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री तारापूरे यांनी स्मार्ट मीटर वीज ग्राहकांच्या घरी बसविणार नाही असे सांगितले होते.मात्र कणकवलीत वीज ग्राहकांना न विचारता अदानी कंपनीचे कर्मचारी फॉल्टी मीटरच्या नावाखाली स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवित आहेत. हे आजपासून बंद झाले पाहिजे. जर स्मार्ट मीटर बसविताना अदानी कंपनीचे कर्मचारी आढळ्यास त्यांना शिवसेना स्टाईलने चोप देण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री तारापूरे व कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांना दिला.तसेच स्मार्ट मीटर बसविणार नाही असे लेखी पत्र देण्यास वैभव नाईक यांनी सांगितले. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे अदानी एनर्जी सोल्युशन अहमदाबाद या कंपनीला वीज ग्राहकांच्या संमत्ती शिवाय स्मार्ट मीटर न बसविण्याचे पत्र महावितरणच्या कणकवली कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे. तसेच कणकवली महावितरण कार्यालया शेजारी असलेल्या अदानी कंपनीच्या कार्यालयात शिवसेना शिष्टमंडळाने धडक दिली.





