कणकवली ( प्रतिनिधी)
अन्नदान,रक्तदानाबरोबरच, ज्ञानदान आणि पुस्तकदानही श्रेष्ठ :- सत्यवान रेडकर
कासार्डे माध्य-व उच्च माध्यमिक विद्यालयातील करिअर मार्गदर्शन वर्गात प्रतिपादन
स्वप्ने उघड्या डोळ्यांनी पाहयला शिका, जीवनात अशक्य काहीच नसते.जीवनात कधीच हार म्हणू नका. स्वतःशी स्पर्धा करायला शिका. तसेच अन्नदान,रक्तदाना बरोबरच ज्ञानदान आणि पुस्तकदान ही श्रेष्ठ आहे. सेल्फ स्टडीची सवय लावा, आपल्यातील उदासीनता दूर करा आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेला सामोरे जा! त्यामुळे अनुभव आणि आत्मविश्वास वाढतो. कोकणात शैक्षणिक चळवळ उभी राहावी आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त मूलं शासकीय परीक्षेत उत्तीर्ण व्हावीत यासाठी आपण नि:शुल्क करिअर मार्गदर्शन करीत असल्याचे प्रतिपादन सत्यवान रेडकर यांनी कासार्डे विद्यालयात केले.
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ‘तिमिरातून त्याच्याकडे’ या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन नि:शुल्क कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यवान रेडकर बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्था पदाधिकारी प्रकाश तिर्लोटकर, माजी विस्तार अधिकारी सुहास पाताडे, कासार्डे विद्यालयाचे पर्यवेक्षक एस व्ही राणे, एक.पी.घुले,डी.जे.मारकड,पी.जे.काळे व इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता.सत्यवान रेडकर पुढे म्हणाले की, शालेय जीवनापासूनच अवांतर वाचनाला सुरुवात करा, टीव्ही, रेडिओवरच्या बातम्या पहा, ऐका. दररोज किमान दोन तरी वर्तमानपत्रे वाचा. आणि खेळाला मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता करिअर म्हणून पहा असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक एस. व्ही. राणे यांनी केली तर सूत्रसंचालन ए पी घुले यांनी केले याप्रसंगी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सुहास पाताडे, संस्था पदाधिकारी प्रकाश तिर्लोटकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रा. अनिल जमदाडे, यशवंत परब, नवनाथ कानकेकर यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी पर्यवेक्षक एस व्ही राणे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.






