फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे ;   जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन

20

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे  ;  जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन

 

ग्राहक दिनानिमित्त कणकवलीत जनजागृतीपर कार्यक्रम 

ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहकांना अधिकार व कर्तव्ये प्राप्त झाली आहेत. ग्राहक आपल्या अधिकारांना महत्त्व देतो, त्याचप्रमाणे कर्तव्यांकडे लक्ष दिले पाहिजे.आपली फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी नेहमीच सजग राहिले पाहिजे. ग्राहक दिन हा एका दिवसाचा इव्हेंटन होता, ग्राहक चळवळ बनली पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा कार्यालय,तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचे उदघाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे योगेश खाडिलकर, ग्राहक पंचायतीचे राज्य सदस्य एस. एन. पाटील, सायबर सेलचे अधिकारी सूरज पाटील, भारतीय मानक ब्युरोचे पुष्पेंद्र मिश्रा, अन्न व आवैषध प्रशासनाचे विजय चौगुले, जिल्हा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष सुभाष पुराणिक, प्रा. हरिभाऊ भिसे, ग्राहक पंचायतीच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षा श्रद्धा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ग्राहक संरक्षण कायद्यांर्गत ग्राहकांसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत.या कायद्यांची माहिती ग्राहकांनी अवगत केली पाहिजे.या कायद्यांर्गत ग्राहकांना अधिकार व कर्तव्यदेखील प्राप्त झाली आहेत.त्यामुळे ग्राहकांनी अधिकारांबरोबर कर्तव्यांकडे लक्ष दिले पाहिजे. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या पॅकेटवर माहिती छापलेली असते, ती माहिती ग्राहकांनी वाचली पाहिजे, असे त्यांनी सांगुन उपस्थितांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

रवींद्र खेबुडकर म्हणाले, सिंधुदुर्गातील जनता ही सुज्ञ आहे. त्यांना आपले हक्क व अधिकार माहिती आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना अधिकारी व कतव्ये दिली आहेत. याची माहिती प्रत्येक ग्राहकाला असली पाहिजे. आपली फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी नेहमीच सजग राहिले पाहिजे. ग्राहकांनी आपल्या अधिकार व हक्कांचा योग्यरीत्या वापर केला पाहिजे.

ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याचे काम शासन व प्रशासन करीत असले तरी ग्राहकांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी तळागाळात जनजागृती होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात प्रोफेशनल काळात काम करताना आलेले अनुभव खेबुडकर यांनी शेअर केले. एस. एन. पाटील यांनी ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविकेत जगदीश कातकर यांनी ग्राहक दिन साजरा करण्यामागील उद्देश सांगितला.

आरंभी स्वामी विवेकानंद व ग्राहक चळवळीचे जनक बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर ग्राहक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांचे स्वागत दीक्षांत देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष नागावकर यांनी केले. यावेळी नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.