लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदे करण्यासह वक्फ कायदा रहित करा | आंदोलना दरम्यान हिंदू जनजागृतीकडून मागणी

202

सावंतवाडी : लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कठोर कायदे करण्यासह वक्फ कायदा रहित करा अशी मागणी हिंदू जनजागृतीकडून करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान करण्यात आली.

लव्ह जिहाद दाराशी येऊन ठेपला आहे. श्रद्धा वालकरच्या मारेकरी आबताफला अद्यापपर्यंत फाशी दिली जात नाही. लव जिहाद हे एक जिल्हा किंवा एका राज्यापुरते मर्यादित नसून ते एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील षडयंत्र आहे. लव जिहाद म्हणजे काय आहे ते प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या, प्रत्येक हिंदू युवतीच्या मनापर्यंत पोहचले पाहिजे. लव जिहादच्या विरोधात कठोर कायदा झाला पाहिजे. धर्मांतर विरोधी राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही धर्मांतर विरोधी कठोर कायदे करावेत, तसेच वक्फ बोर्डचा कायदा रहित करावा, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदु आंदोलनाच्या अंतर्गत कुडाळ येथे आंदोलन करण्यात आले. याविषयीचे निवेदन लवकरच प्रशासनाला देण्यात येणार आहे.

कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयासमोरील एस्.एन्. देसाई चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना रणरागिणी शाखेच्या कु. प्राची शिंत्रे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात महिलांना त्रास देणार्‍यांचा चौरंग्या केला जात होता ; मात्र आज श्रद्धा वालकरची हत्या होऊन अद्याप आरोपीला शिक्षा झाली नाही. लव जिहादच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक हिंदु युवती आणि महिला यांचे बळी गेले आणखी किती हिंदू युवतींचे बळी जाऊ देणार आहोत..?

या वेळी बोलताना हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी सांगितले की, आज उत्तरप्रदेश , मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, ओडीसा या राज्यात धर्मांतर बंदी कायदा आहे . गोवा राज्यातही हा कायदा होऊ घातला आहे. महाराष्ट्रातही हा कायदा व्हावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपण करत आहोत .

हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर म्हणाले की, आज आपण हिंदू समाज ८० टक्के असुनही मुठभर लोक आपल्यावर वर्चस्व गासवत आहेत. लव जिहाद, धर्मांतर यांच्या माध्यमातून आपले शोषण केले जात आहे. आपल्याकडे धर्मशिक्षणाची सोय नसल्यानेच अशा घटना वाढत चालल्या आहेत. आज आपण संख्येने अधिक आहोत म्हणून काही परिणाम होणार नाही, अशा भ्रमात हिंदूंनी राहू नये. संघटित होऊन अशा आंदोलनांच्या माध्यमातून एकत्र आले पाहिजे. देशात आज दरवर्षी आठ लाख हिंदूंचे धर्मांतर केले जाते, ही मोठी गंभीर समस्या आहे.

या वेळी समितीचे श्री. राजेंद्र पाटील यांनी हिंदूंच्या धर्मांतराच्या वाढत्या घटनांमुळे हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीच ही आंदोलने आहेत, असे सांगितले.

या वेळी हिंदूनो आपल्या तरुणी लव्ह जिहादला बळी पडू नये, यासाठी कटीबद्ध व्हा.. ! धर्मरक्षण करा.. ! युवतींनो लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकू नका.. ! वक्फ कायदा रहित करा.. ! आदी घोषणा देत आणि याविषयीचे विविध फलक हातात धरुन जन प्रबोधन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अदिती तवटे हिने केले.