वायरीच्या किनारपट्टीवरील गझिबो मोडकळीस ; ज्येष्ठांसाठी सुविधा उभारा: नागरिकांची मागणी ;पर्यटनासही होणार लाभ….
वायरी भूतनाथ सारख्या पर्यटन स्थळावरील किनाऱ्यांवर उभारण्यात आलेले गाझिबो आता मोडकळीस आले असून शेवटच्या घटका मोजताना दिसत आहेत. शासनाने निधीची तरतूद करून किनारपट्टीची शोभा वाढविणारे गझिबो पुन्हा नव्याने उभारावेत अशी मागणी पर्यटन व्यावसायिकां बरोबरच ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टीवरील काही पर्यटन गावांमध्ये जिल्हा नियोजनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून गाझिबो उभारण्यात आले होते. या गाझीबोंचा ज्येष्ठ नागरिक व पर्यटकांना लाभ होत होता.
ज्येष्ठांसाठी नाना- नानी पार्क ……
वायरी भूतनाथ येथेही किनारपट्टीवर अशाच प्रकारचा गाझिबो उभारण्यात आला होता. आता हा गाझिबो नादुरुस्त झाला असून तो मोडकळीस आला आहे. या ठिकाणी जिल्हा नियोजनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून नव्याने गझिबो उभारावेत अशी मागणी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. याच ठिकाणी किनारपट्टीवर सूर्यास्ताच्या वेळी जेष्ठ नागरिक चालण्या साठी येत असतात. या नागरिकांना किनारपट्टीवर सुविधा मिळाव्यात यासाठी येथे नाना-नानी पार्क उभारल्यास ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ होणारा आहे.
……………….
स्थानिकांबरोबरच पर्यटनाला फायदा…
वायरी भूतनाथच्या किनारपट्टीवरील परिसराची शोभा वाढविण्यासाठी गझिबो, नाना-नानी पार्क, पाथ वे, प्रसाधनगृह उभारावेत अशी नागरिकांची मागणी असल्याचे पर्यटन व्यावसायिक आणि भाजपाचे प. स. मतदार संघ प्रभारी देवानंद लोकेगावकर म्हणाले. वायरी भूतनाथच्या किनारपट्टीवर सुशोभीकरण झाल्यास स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटन वाढीसाठीही मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.