स्थानिकांचा विरोध डावलून दडपशाहीने मायनिंग सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. शासन आहे की विकले गेले, ग्रामस्थांचा संतप्त सवाल. साटेली गावाचा इकोफिनसिटिव्ह गावामध्ये समावेश
सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावात अचानकपणे पुन्हा एकदा मायनिंग सुरू केल्याने ग्रामस्थ,स्थानिक शेतकरी व मायनिंग कंपनी यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. गावात मायनिंग नको अशीच भूमिका साटेली ग्रामस्थांनी घेतली आहे. मात्र स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असूनही मायनिंग कंपनीने उत्खनन सुरू केल्याने स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली असून सदरील मायणी कायद्यात की फायद्यात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिकांचा विरोध असूनही दडपशाही व गुंडगिरीने या ठिकाणी उत्खनन केले जात असून स्थानिक शेतकरी व जमीनदार व स्थानिक ग्रामस्थ यांना धमकविण्याचेही काम कंपनीने नेमलेल्या बॉडीगार्ड कडून करण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
साटेली गावात गेली दहा वर्षे मायनिग उत्खनन बंद आहे.मायनिंग खनिज उत्खनन चुकीच्या पद्धतीने होत असल्याने मायनिंग लीज भू धारकांचे मायनिंग चालवणारी कंपनी भू भाडे देत नसल्याने, साटेली मायनिंग क्षेत्रात माननीय उत्खनन करणाऱ्या कंपनीची दादागिरी व गुंडगिरी करणारी माणसे आणून स्थानिकांना त्रास दिल्या कारणाने खनिज उत्खननमुळे साटेली गावात गंभीर समस्या निर्माण झाल्याने गावातील सर्व नुकसानग्रस्त भूधारकांनी,शेतकरी बागायतदार, शेतकरी ग्रामस्थ, साटेली नुकसानग्रस्त गाडी मालक व साटेली ग्रामपंचायत ग्रामसभेच्या ठरावनिशी साटेली सरपंच यांनी सर्व शासनाच्या संबंधित कार्यालयांकडे मायनिंग विरोधात तक्रारी दिल्याने साटेली मायनिंग उत्खनन बरेच वर्षे बंद होते. बंद राहिलेल्या कालावधीत धी डेक्कन मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा त्यांच्या वतीने कुठच्याही कंपनीने किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांकडून गावात मायनिंग उत्खननामुळे उद्भवलेल्या समस्यांवर व झालेल्या नुकसानी बाबत कोणतेही कार्यवाही न करता कोणतीही नुकसान भरपाई व तक्रारींचे निवारण करण्यात आलेले नाही. असे असताना साटेली गावात 4 नोव्हेंबर 2024 पासून पुन्हा बेकादेशीरपणे उत्खनन सुरू करण्यात आले असे साटेली ग्रामस्थानी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे.उत्खनन करणारी कंपनी कोणती? त्यांचा मालक कोण? सदरील व्यक्ती नाव गाव पत्ता माहित नाही.मायनिंग क्षेत्रात उत्खनन कामी वावरणाऱ्या व्यक्ती कोण?सदरील व्यक्ती कोणाच्या परवानगीने साटेली गावात मायनिंग उत्खनन करीत आहेत. याविषयी भूधारकांना, जमीनदारांना,शेतकऱ्यांना,साटेली ग्रामपंचायतला कोणती लेखी किंवा तोंडी कल्पना नाही.असे असताना गावात मायनिंग सुरू कसे होते?याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट म्हणजे साटेली गाव हा इको सेन्सिटिव्ह झोन मधील गाव म्हणून जाहीर झाला आहे आणि याकडे संबंधित विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी सोईस्कर रित्या दुर्लक्ष करत आहेत.
याचा नेमका अर्थ काय?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मायनिंग कंपन्यांच्या दडपशाहीने सुरु असलेले मायनिंग तात्काळ बंद व्हावे आणि गावात मायनिंग प्रकल्प नको अशी भूमिका साटेली ग्रामस्थांनी घेतली आहे. यामुळे साटेली गावात बेकायदेशीर रित्या मायनिंग उत्खनन सुरु असून सदरील बेकायदेशीर उत्खनन बंद करावे अन्यथा साटेली ग्रामस्थ 26 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडतील असा इशारा जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देवून देण्यात आला आहे.
यामुळे ग्रामस्थांचा विरोध असूनही खरोखरच साटेली गावात सुरु असलेले मायनिंग उत्खनन हे कायद्यात की फायद्यात असा प्रश्न पडत आहे.