देवगड / प्रतिनिधी
हा परिसर शासन मायनिंग झोन म्हणून घोषित करणार का ? युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक
खनिज सर्वेक्षणात शिवसेनेचा विरोध राहील ; स्थानिक जमीन मालक व शेतकरी यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील
देवगडसारख्या पर्यटन तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील जामसंडे येथे खनिज सर्वेक्षण व संशोधन करण्याची भूमिका खनिकर्म विभाग व महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. या परिसरात मायनिंग आणण्याचा घाट महाराष्ट्र शासन करीत असून जमीन मालकांच्या जमिनी लाटण्याचा प्रकार शासन करीत आहे. रेडी, कळणेसारखे मायनिंग आणून शेतकरी, बागायतदार जमीन मालकांना देशोधडीला लावण्याचा प्रकार शासन करीत आहे. येथील संशोधनानंतर शासनाची नेमकी भूमिका काय आहे? हा परिसर शासन मायनिंग झोन म्हणून घोषित करणार का? असा सवाल उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी येथील पत्रकार परिषदेत उपस्थित करून आपण संबंधित जमीन मालकांच्या भूमिकेशी बांधिल राहणार असून संशोधनास आपला विरोध राहणार असल्याचे सांगितले.





