..…मोबाईल लोकेशन ट्रेस पद्धतीमुळे त्यांची वैयक्तिक गोपनीयता येतेय धोक्यात
महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांना रोजच्या कामकाजासाठी मोबाईल देवू केले आहेत.अंगणवाडी उघडणे,स्वत:ची हजेरी लावणे, ० ते ६ वयोगटातील मुले, स्तनदा माता, गरोदर महिला यांच्याबाबतचा सर्व सेवा याच मोबाईल रजिस्टरवर नोंद कराव्या लागतात.मात्र या मोबाईलमुळे अंगणवाडी सेविकांची गोपनीयता धोक्यात आली आहे.हा मोबाईल २४ तास अंगणवाडी सेविका कोठे आहेत याची मोबाईल लोकेशनद्वारे माहिती वरिष्ठ कार्यालयाला पुरवित असतो.या मोबाईलवरील लोकेशन बंद केले तरी त्यावरील सॉफ्टवेअर ते बंद करू देत नाही.वास्तविक कामाचे तास संपल्यानंतर मानधनी कर्मचाऱ्यांवर लोकेशनद्वारे नजर ठेवण्याचा प्रकार अत्यंत अपमानास्पद असून अंगणवाडी सेविकांवर शासनाचा एवढा आकस का हा प्रश्न निर्माण होतो आहे.
अंगणवाडी कार्यकर्ती हा घटक कोणतीही सरकारे असोत त्यांच्याकडे आकसाने पाहिले जाते असे दिसून येते.आज त्यांना केवळ १० हजार रूपये मानधन मिळते. अंगणवाडी मदतनीसांना किमान वेतनापेक्षा मानधन मिळते.शेकडो आंदोलने केल्यावर हा दहा हजार रूपये पगार करण्यात आला.मात्र कामाची वेळही दोन तासांनी वाढविण्यात आली.लाखो रूपये पगार घेणारे अनेक शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत न येणे, कार्यालयीन वेळेत अन्य कामे करणे याबाबत उघड होत आहे मात्र केवळ १० हजार रूपये मानधन घेवून वेठबिगारीसारखी कामे करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.
हे मोबाईल अंगणवाडी इमारतीतच ठेवल्यास अंगणवाडी इमारतींची अवस्था पाहता मोबाईल चोरी झाल्यास कोण जबाबदार आहे हा प्रश्न निर्माण होतो.देवगड शहरातच अंगणवाडीसाठी बांधलेल्या सर्वच सर्व इमारती पडल्या.अंगणवाडीसाठी एकही इमारत नाही.अशी स्थिती असताना अखेर नाईलाजाने अंगणवाडी कामासाठी दिलेला मोबाईल सोबत बाळगावा लागतो.यामुळे अंगणवाडी सेविकांची प्रायव्हसी धोक्यात आली आहे.अंगणवाडी सेविका याबाबतीत हतबल असून संतप्त झाल्या आहेत.एखाद्या व्यक्तिचे लोकेशन ट्रेस करणे हा त्याचा वैयक्तिक स्वातंत्र्यावर घातलेला बेकायदेशीर घाला असून असा प्रयोग अन्य क्षेत्रातील कामचुकार कर्मचाऱ्यावर सरकार करण्याची हिमंत करेल काय असा सवाल केला आहे.