वैश्य समाज शतक महोत्सवी शोभायात्रा | दीपक केसरकर राहणार उपस्थित

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज व सावंतवाडी वैश्य समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात येणा-या शोभायात्रेत महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सावंतवाडी संघटनेचे पदाधिकारी बाळ बोर्डेकर यांनी दिली.

या शतक महोत्सवाच्या निमित्ताने रविवार १२ ला सावंतवाडी येथे तीन राज्यांचा वधू वर मेळावा होत आहे. यात सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक येथील वधू-वर सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याचा लाभ इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. वैश्य बांधवांच्या माध्यमातून ११ फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत कणकवली येथील सर्वेश भिसे यांचे महिला आणि पुरुषांचे ढोल पथक व नेरूर येथील चित्ररथाचा सहभाग असणार आहे. या शोभा यात्रेची सुरुवात वैश्य समाजाचे गुरु श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे.

ही शोभायात्रा सालईवाडा मुरलीधर मंदिर ते वैश्यवाडा गवळीतिठा अशी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत काढण्यात येणार आहे. या निमित्ताने महिलांसाठी फनी गेम्स, संगीत खुर्ची, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या दिवशी येथील वैश्य भवन सभागृहात वधू वर मेळावा होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला वैश्य बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.