परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ ; भालचंद्र महाराज यांच्या जयघोषाने कनकनगरी दुमदुमली
योगियांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवास बुधवारी कणकवलीत भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून भालचंद्र महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत.
आज पुण्यतिथी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ही गुरुवारी पहाटे भालचंद्र महाराज यांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले. पहाटेच्यावेळी भक्तांनी काकड आरती करत वातावरण भक्तिमय केले. सकाळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात सर्व भक्तांच्या कल्याणार्थ भालचंद्र महारुद्र, महाभिषेक अनुष्ठान केला. यावेळी भालचंद्र संस्थांचे अध्यक्ष व कमिटीचे पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते.
दुपारी भालचंद्र महाराज यांची महाआरती करण्यात आली. आरतीला देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भजनी कलाकारांनी भजने सादर करून वातावरण भक्तिमय केले. भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त संस्थात परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भालचंद्र महाराज यांची मूर्ती व समाधी स्थळ विविध फुलांच्या सहाय्याने सजविण्यात आले आहे.
भालचंद्र महाराजांचे हे मनमोहक दृष सर्वांचे लक्षवेधून घेत होते. भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवामुळे शहरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी संस्थान परिसरात गर्दी दिसून आली.भाविक भक्तांनी कनकनगरीचा परीसर फुलुन गेला असुन भक्तांची मांदियाळी पसरली आहे.”भालचंद्र गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी, दिगंबरा दिगंबरा भालचंद्र बाबा दिगंबरा,पायी हळूहळू चाला मुखाने भालचंद्र बोला”या जयघोषाने भालचंद्र महाराज संस्थान परीसर आणि कनकनगरी दुमदुमून गेली असुन भक्तिमय वातावरणाने परीसर बाबांच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.