देवगड (प्रतिनिधी)
देवगड महाविद्यालयातर्फे मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले
श्री. स. ह. केळकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने तहसील कार्यालय देवगड आणि नगरपंचायत देवगड-जामसंडे यांच्या मदतीने मतदार जागृती संदर्भात विविध उपक्रम राबविले आहेत. सध्या सर्वत्र आपल्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा उत्सव सुरु आहे. आपल्या राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम प्रसिद्ध व्हायच्या आधीपासून केळकर महाविद्यालयातील NSS विभागाने जुलै महिन्यात नवमतदार नोंदणी अभियान राबवून २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची यशस्वीपणे मतदार नोंदणी केली आहे. त्याच बरोबर मतदार यादीमध्ये आपल्याशी संबधित दुरुस्त्या कश्या करायच्या यासंदर्भातील कार्यशाळा आयोजित केली होती. आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपण स्वतः जबाबदार असतो. आपला पर्यायाने आपल्या परिसराचा, राज्याचा तथा राष्ट्राचा विकास घडवून आणण्याची क्षमता आपल्या एका मतात आहे त्यामुळे लोकशाही प्रणालीत एका-एका मताला अमूल्य महत्व आहे असे सुतोवाच NSS विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश वानखडे यांनी आपल्या भाषणातून केले. मतदार जनजागृती संदर्भात महाविद्यालयातील NSS विभागाने सातत्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत त्याचाच भाग म्हणून मतदान प्रतिज्ञेनंतर महाविद्यालय ते देवगड बस स्थानकापर्यंत मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी मतदान/मतदार जनजागृती फेरी काढली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
मतदारांचे लक्ष आकर्षित करून व्यापक स्तरावर मतदान जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयातील NSS स्वयंसेवकांनी देवगड-जामसंडे नगर पंचायतीच्या सहकार्याने लोकशाही दिंडी काढली होती. तसेच महाविद्यालायातील सर्व घटकांचे लक्ष वेधून मतदान जनजागृती करण्यासाठी मानवी शृंखला तयार करून जास्तीत जास्त मतदान करण्याचा संदेश दिला आहे.
याशिवाय महाविद्यालयाने ‘इलेक्शन क्लब’ तयार करून विद्यार्थी ज्या गाव वाडी-वस्त्यांमध्ये राहतात तेथे वैयक्तिक स्तरावर मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे.





