देवगड (प्रतिनिधी)
देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नळ पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे श्रेय महायुती सरकारचे – विलास साळसकर
मी मुंबईहून एका बॅगेसह आलो आणि कट्टर शिवसैनिक म्हणून इथे स्थायिक झालो. दुसरी बॅग मुंबईत भरलेलीच – विलास साळसकर
देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील अनेक वर्षे रखडलेल्या नळ पाणी योजनेचा प्रश्न महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला असून, या योजनेचे श्रेय अन्य कुणीही घेऊ नये, असे स्पष्ट मत तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
शिवसेनेच्या माध्यमातून २०१४ साली तात्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत नागपूर अधिवेशनात पाणी विभागाच्या बैठकीत या प्रश्नाला चालना मिळाली होती. तत्कालीन उपसरपंच गजानन प्रभू, तालुकाप्रमुख साळसकर आणि स्थानिक ग्राहक दयानंद मांगले यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर पुढील कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. मात्र, त्यानंतरच्या पाच वर्षांत नगरपंचायतीकडून ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. पुढील निवडणुकीत शिवसेनेने पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आणि सत्तांतरानंतर हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम सुरू झाले.
कोविडमुळे दोन वर्षे वाया गेली. त्यानंतर महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि एका नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. पालकमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आणि नेते किरण सामंत यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी सतत संपर्क साधून पाणी आरक्षण मंजुरी मिळाली. विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेचे काम पूर्ण होईल, असे साळसकर यांनी सांगितले.
नगरपंचायतीच्या अंतर्गत कामकाजावर गंभीर आरोप
देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी हे आमदारांचे समर्थक असून, बंद लाईटमध्ये गुप्त बैठका घेण्याचे आरोप होत आहेत. नगरसेवकांच्या अंतर्गत वादांमुळे मोठ्या प्रमाणात विकास निधी रद्द होऊन तो अन्यत्र वळवला जात असल्याचे साळसकर म्हणाले. प्रभाग क्रमांक ११ मधील प्रसाधनगृहाला पाच स्टार मानांकन मिळाले असले, तरी त्याची सध्याची दुर्दशा जबाबदार कोण याचा विचार होणे गरजेचे आहे.
बसस्थानकासमोरील ‘आय लव्ह यू देवगड’ सेल्फी पॉईंट गेल्या तीन महिन्यांपासून अंधारात आहे. पर्यटकांची नाराजी यामुळे वाढत असून, यासाठी जबाबदार कोण, असा सवाल साळसकर यांनी उपस्थित केला.
शिवसेनेचे संघटन आणि बदलत्या राजकारणाचा आढावा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना संपविण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी २००७ साली केला होता. त्यावेळी मुंबईहून देवगड तालुक्यात येऊन संघटन वाढविण्याचे काम केले, असे साळसकर म्हणाले. तालुक्यातील शिवसैनिकांनी मोलाची साथ दिली असून, शिवसेनेची ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे. बदलत्या राजकारणात काही मंडळी पक्षांतराच्या तयारीत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
“मी मुंबईहून एका बॅगेसह आलो आणि कट्टर शिवसैनिक म्हणून इथे स्थायिक झालो. दुसरी बॅग मुंबईत भरलेलीच आहे,” असे म्हणत साळसकर यांनी आपली राजकीय बांधिलकी व्यक्त केली.





