सावंतवाडी (मंगल कामत)
मी परबांची लेक, गप्प बसणार नाही ; घारेंचा तेलींना इशारा
महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदरपासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. कालपर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता, टीका करत होता. शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी विषयी आपण काय बोलत होता ?जरा आठवा. शरद पवार यांनी कोकणासाठी काय केले ? तुम्हीच प्रेस घेऊन सुप्रिया सुळे यांना सिंधुदुर्ग दौर्यावर असताना विचारले होते ना ? आता आयत्या वेळेला येऊन तिकिटावर डल्ला मारला. माझ्यावर सावंतवाडीचे संस्कार आहेत. मी स्वतःहून कोणावर टीका टिपणी करत नाही. पण तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करत असाल तर मी गप्प बसणार नाही. मी देखील परबांची लेक आहे असा इशारा अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी देत तेलींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.
त्या म्हणाल्या, आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय फक्त तुमच्या सारख्या आयाराम गयारामाचे काम करायचे का ? पक्षाच्या कठीण काळात पक्षाबरोबर आम्ही रहायचे आणि आयत्या वेळेला तुमच्या सारख्या सराईत दलबदलूने यायचे आणि आम्ही त्याचा उदो उदो करायचा ? असे कसे चालेल ? तेव्हा या पुढे मीच नाही तर कोणत्याही स्वाभिमानी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर बोलताना विचार करून बोला अशा कडक शब्दांत राजन तेली यांना सुनावले घारेनी त्यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.





