सावंतवाडी (प्रतिनिधी)
माझे स्टार प्रचारक “शेतकरी बांधव”आणि तरुण युवक व गोरगरीब जनता ; मी आमदार होणे ही काळाची गरज ; अपक्ष उमेदवार विशाल परब
अन्नपूर्णा देवतेची ‘ शेगडी ‘ ही निशाणी मला मिळाली आहे आणि हि निशाणी सावंतवाडी मतदारसंघातील जनतेच्या मनात वसवली आहे. मतदारसंघाचि विकास होण्यासाठी आणि बेरोजगारी हटवण्यासाठी हा ३५ वर्षाचा विशाल परब आमदार होणे ही काळाची गरज आहे आणि हा इतिहास मी घडवणारच, असा आत्मविश्वास सावंतवाडी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी व्यक्त केला.
आज मंगळवारी सावंतवाडी येथे आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विशाल परब बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत अमित परब, केतन आजगावकर, अमेय पै, बाळा जाधव उपस्थित होते.
जनतेच्या आशीर्वादाने मी आज राज्यभर पोचलो असून, माझ्या मागे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता उभी आहे. माझे स्टार प्रचारक शेतकरी बांधव, तरुण-तरुणी, भाजीपाला व फळे विक्रेते, गोरगरीब जनता आहे. माझ्याजवळ विकासाचे मोठे व्हिजन आहे.
सावंतवाडी मतदारसंघ मी विकसित करू शकतो. मी आमदार झाल्यावर तरुणांच्या लक्षात येईल की, विशाल परब हे व्हीजन काय आहे. मला कुठले ही पद नको. मी साधा कार्यकर्ता आहे. मला निवडून दिल्यावर शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी जनतेसाठी झटत राहीन. कायमस्वरूपी या मतदारसंघात मी तुमच्यासाठी उपलब्ध असेन. मुंबईला जाणार नाही. असे विशाल परब यावेळी म्हणाले.
देव देवता व जनतेचे आशीर्वाद घेऊन मी माझ्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. यापूर्वी मी मतदारसंघात झंजावती दौरा केला असून जनतेचा जनाधार पाहिल्यानंतर माझे अश्रू अनावर झाले. माझे चिन्ह घरोघरी पोचले आहे. गोरगरीब जनतेला विशाल परब आमदार म्हणून पाहिजे आहे. यावेळी मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नसून, माझ्यासारखे हजारो विशाल परब तयार होण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत.
त्यामुळे येणाऱ्या २३ तारखेला माझ्या विजयाचा गुलाल उधळला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाने नियमानुसार माझ्यावर कारवाई केली असली तरी मी कोणावरही नाराज नाही. पक्षाने त्यांचे काम केले असले तरी माझी निष्ठा बदलणार नाही. भविष्यात हा ३५ वर्षाचा युवक विधानसभेत आपल्याला कष्टकरी शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचे काम नक्कीच करेल. रोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम मी कटिबद्ध राहीन.
विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने ती पूर्ण करण्याचे वचन तुम्हाला देतो, असे विशाल परब म्हणाले.





