दीपोत्सवात लख्य लख्ख दिव्यांनी उजळले कुणकेश्वर ! आमदार नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती

109

 

देवगड (स्वप्नील लोके)

दीपोत्सवात लख्य लख्ख दिव्यांनी उजळले कुणकेश्वर ! आमदार नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती

दीपावली पाडव्याच्या निमित्ताने केले जातेय आयोजन

दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी १५ हजार दिव्यांनी कुणकेश्वर परिसर हा दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला .श्री देव कुणकेश्वर मंदिर व मंदिर परिसरात दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

श्री देव कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात शंभू महादेवाच्या शिवलिंगा भवताली फुलांची व दिव्यांची आकर्षक मनमोहक आरास करण्यात आली होती . दीपोत्सवात केलेली विद्युत रोषणाई, त्याचबरोबर मंदिर परिसरात पेटविलेल्या दिव्यांमुळे कुणकेश्वर मंदिर लख्ख उजळून निघाले होते.

या दीपोत्सवाच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दौऱ्यावर असलेले कणकवली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार नितेश राणे यांनी देखील या उत्सवास भेट देऊन श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले.यावेळी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते आमदार नितेश राणे यांचा सत्कार करण्यातआला.

यावेळी कुणकेश्वर देवस्थानचे पदाधिकारी, सरपंच महेश ताम्हणकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, दयानंद पाटील आदी उपस्थित होते.श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आयोजित संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी चांगली दाद दिली. 

मंदिर परिसरात विविध आकर्षित रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. देवगड पंचक्रोशीतील असंख्य भाविकांची कुणकेश्वर दीपोत्सवास उपस्थिती होती .त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने कुणकेश्वर मंदिर परिसर गजबजून गेलेला पहायला मिळाला.