ओंकार भोजने आणि मनीष दळवी ठरले यंदाचे ‘कोकण रत्न’ पुरस्काराचे मानकरी ; रेणू दांडेकर यांना समाजगौरव पुरस्कार, पद्मश्री राहीबाई यांची उपस्थिती

16

 

 

मुंबई (मंगल कामत)

ओंकार भोजने आणि मनीष दळवी ठरले यंदाचे ‘कोकण रत्न’ पुरस्काराचे मानकरी ; रेणू दांडेकर यांना समाजगौरव पुरस्कार, पद्मश्री राहीबाई यांची उपस्थिती

३१ ऑक्टोबर २०२४ रोजी कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात “कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आपल्या दर्जेदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे मराठी सिनेसृष्टीतील तसेच टेलिव्हिजन वरील सध्या चर्चेत असलेले प्रेक्षकांचे लाडके कलाकार कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांना यावर्षीच्या कोकण संस्थेच्या राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करून देणाऱ्या तसेच जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येकाला जिल्हा बँकेशी जोडून त्यांना सहकारच्या परीघात आणणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना सहकारातील कार्यासाठी कोकणरत्न तर रेणुताई दांडेकर यांना समाज गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री राहीबाई पोपेरे, हिरवळ ग्रुपचे अध्यक्ष किशोर धारिया, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ. रेणुताई दांडेकर, आवाजाचे जादूगार आणि मराठी सिनेश्रुष्टीतील दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, सिंधुदुर्ग बॅंकचे उपाध्यक्ष दिनकर तावडे आणि कोकण संस्थेचे अध्यक्ष श्री दयानंद कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

युवा गायकांच्या सुरेल भावगीत मैफिलीने सुरु झालेल्या या कार्यक्रमात समाजाच्या विकासासाठी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना समाज गौरव पुरस्कार, कन्टेन्ट क्रिएटर्ससाठी ‘रील टू रियल’ पुरस्कार, ग्रामविकासातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदर्श गाव पुरस्कार, ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘झिरो टू हिरो’ पुरस्कार, तसेच युवा उद्योजकांसाठी ‘युथ आयकॉन’ पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचे वितरण हि करण्यात आले.

५०० + कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय ओवळे आणि संजना पाटील यांनी केले. संस्थेचे योगेश भोसले, कॉन्टेन्ट क्रिएटर गौरी पवार, अजित दळवी सर, सुनील करडे, गणेश नाईक, तसेच संस्थेचे व्यवस्थापक आणि संस्थेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.