सौ. विनिता व दिनेश परब ‘श्रीमान श्रीमती’ चे मानकरी ; मडुरा परब मित्र परिवाराचे आयोजन
बांदा : प्रतिनिधी
मडूरा माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त परब मित्र परिवार आयोजित ‘श्रीमान श्रीमती’ कार्यक्रमाचे पारितोषिक सौ. विनिता व दिनेश परब या उभयताने पटकावले. विविध प्रश्नांची अचूक उत्तरे, परस्परांमधील संवाद, उत्तम नियोजन याचा मिलाप साधत त्यांनी या किताबावर आपले नाव कोरले. मान्यवरांच्या हस्ते १० हजार रुपये किमतीची पैठणी, स्मार्ट वॉच देऊन गौरविण्यात आले.
मडूरा माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. परब मित्र परिवारातर्फे विवाहित जोडप्यांसाठी श्रीमान श्रीमती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गावातील १३ जोडप्यांनी सहभाग घेतला. यात तळ्यात – मळ्यात, कपाचे मनोरे रचणे, फुगे फुगविणे, परस्परांच्या आवडी निवडी, नातेसंबंध, सामान्य ज्ञान प्रश्न अशा एकूण चार फेऱ्यांमध्ये स्पर्धकांचा कस लागला.
यात सौ. विनिता व दिनेश परब प्रथम तर सौ. श्रावणी व कृष्णकांत परब यांनी दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. परब मित्रमंडळाचे प्रवीण परब, केशव परब, भूषण परब, सखाराम परब, सिद्धेश परब, प्रशांत परब, संतोष परब, रुपेश परब यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. प्रेक्षकांसाठी असलेले खास पारितोषिक सुनील मडुरकर यांनी सामान्य ज्ञान प्रश्नाचे अचूक उत्तर देत मिळविले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन पोलीस पाटील नितीन नाईक यांनी केले. तुषार धुरी व माया परब यांनी गुणांकन केले. कार्यक्रमासाठी महिलांसह ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.