३०० पेक्षा अधिक मुलींना कराटे प्रशिक्षण देऊन ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ अनोख्या पद्धतीने साजरा ; कासार्डे माध्य-विद्यालयातील स्तुत्य उपक्रम

39

 

कणकवली दि ३० ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर)

 

३०० पेक्षा अधिक मुलींना कराटे प्रशिक्षण देऊन ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ अनोख्या पद्धतीने साजरा ; कासार्डे माध्य-विद्यालयातील स्तुत्य उपक्रम

 

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस २९ ऑगस्ट रोजी “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून देशभर साजरा केला जातो.सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कणकवलीमधील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा जनजागृती रॅली काढून आणि प्रशालेतील इ.५वी ते इ.९ वी तील ३०० पेक्षा अधिक मुलींना स्वसंरक्षणार्थ कराटेचे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय क्रीडा दिन अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला आहे.

याशिवाय राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने प्रशालेत दि.२६ ऑगस्ट पासून लगोरी, दोरीउडी,रस्सीखेच,कॅरम,लंगडी,हॉलीबॉल,कॅरम यांसारख्या विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करून मोठ्या उत्साहात ‘क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला.कासार्डे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत ज्यूदो-कराटेचे मोफत प्रशिक्षण हा उपक्रम गेली सत्तावीस वर्ष सुरू आहे.


आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्य साधून प्रशालेतील सर्व मुलींना त्यांच्या स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम ज्यूदो-कराटे ब्लॅक बेल्ट धारक क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.याप्रसंगी प्रशालेतील ज्युडो कराटेच्या मुलांनी प्रात्यक्षिके सादर केली.या उपक्रमाला स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,स्कुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ बी.बी.बिसुरे यांनी मुलींना मार्गदर्शन करताना प्रत्येक मुलीने स्वतःचे स्वसंरक्षण स्वतः करण्यासाठी कराटेसारखी कला आत्मसात करायलाच हवी असे उद्बोधन करून समाजात वावरताना नेहमी सतर्क आणि सक्षम राहण्याचे आवाहन केले.पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने प्रशालेत आयोजित केलेल्या विविध खेळांच्या स्पर्धेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.बी.बी.बिसुरे ,पर्यवेक्षक श्री.एस.व्ही. राणे,यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.दत्तात्रय मारकड यांना क्रीडा विभागातील सर्व शिक्षक तसेच इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.या उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम विद्या शिरस यांनी विशेष कौतुक करून विविध स्पर्धेत सहभागी खेळाडुंना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले आहे.