कणकवली रेल्वेस्टेशन सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

5

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)दि.२ जुलै २०२४

कणकवली रेल्वेस्टेशन सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

 

कणकवली रेल्वेस्टेशनच्या सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर प्रवाशांसाठी भव्य शेड उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर आकर्षक बसथांबे, रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला गार्डन, त्यामध्ये बच्चेकंपनींसाठी खेळणी, प्राण्यांचे स्टॅच्यू अशी विविध कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर भव्य प्रवेश कमानी उभारण्यात आली आहे. गुरुवारी सा.बां.चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी या कामाची पाहणी केली. लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास नेवून त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या बांधकाम विभागातर्फे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कोकणातील १२ रेल्वेस्थानक परिसर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. सिंधुदुर्गातील मध्यवर्ती असलेले कणकवली रेल्वेस्थानक, सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानक, कुडाळ रेल्वेस्थानक, सावंतवाडी रेल्वेस्थानक या चार स्थानकांचा यामध्ये समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटक जिल्हयात येतात. रेल्वेने जिल्हयात येणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना रेल्वेस्थानकाबाहेर सोयीसुविधा मिळाव्यात, तेथील परिसर पाहून प्रसन्न वाटावे या हेतूने रेल्वेस्थानक परिसरांचे सुशोभिकरण हाती घेण्यात आले आहे. गेल्या ६ महिन्यापासून कणकवलीसह चारही रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम सुरु आहे.

कणकवली रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर भव्य आकर्षक अशी शेड उभारण्यात आली आहे. त्याला विमानतळासारखा डोमशेप लूक देण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना रिक्षा आणि एसटी साठी आकर्षक थांबे उभारण्यात आले आहेत.

दोन्ही बाजूने काँक्रिट रोड करण्यात आले आहेत. या रोडच्या एका बाजूने आणि मध्यवर्ती गार्डन करण्यात
आले आहेत. त्यात मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी लावण्यात आली आहेत. तसेच प्राण्यांचे स्टॅच्यूही उभारण्यात आले आहेत. कोकणची संस्कृती, इथली संत परंपरा दाखवणारी छायाचित्रे भिंतीवर साकारण्यात येत आहेत. तसेच रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भव्य कमानी उभारण्यात आली आहे. ही सर्व कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. उर्वरित काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेस्थानक परिसर हायटेक दिसणार आहे. रेल्वेसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना येथे आल्यानंतर प्रसन्न वाटणार असल्याचे कार्यकारी अभियंता श्री. सर्वगोड यांनी सांगितले.