बांदा-दाणोली रस्त्यावरील त्या धोकादायक वळणांवर अखेर लागले फलक ; गवंडे कल्याणकर व दाभोळकर यांच्या प्रयत्नांना यश

14

सावंतवाडी (हेमंत मराठे)२९ जून२०२४

बांदा-दाणोली रस्त्यावरील त्या धोकादायक वळणांवर अखेर लागले फलक ; गवंडे कल्याणकर व दाभोळकर यांच्या प्रयत्नांना यश

 

 

प्रत्येक पावसाळ्यात बांदा-दाणोली रस्त्यावरील वाफोली धरण परिसरातील त्या अचानक समोर येणाऱ्या धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक नसल्याने बाहेरून येणारे पर्यटक व वाहनचालकांना या वळणांचा अंदाज न आल्याने कायम अपघात घडत असतात. अशा धोकादायक वळणांच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याकरिता येथील नागरिक वारंवार मागणी करत होते. परंतु प्रशासनाकडून त्याला दाद दिली जात नव्हती. मागील दोन दिवसात त्याच वळणांवर चार अपघात घडले. अखेर स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे,गुरु कल्याणकर व हेमंत दाभोळकर यांना याबाबत माहिती दिली. त्याची दखल घेत कल्याणकर,गवंडे व दाभोलकर यांनी त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी शाखा अभियंता श्री प्रमोद लोहार यांच्याशी संपर्क साधत तातडीने या वळणांवर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी केली. अधिकारी श्री.लोहार यांनी देखील त्यांच्या मागणीची तत्परतेने दखल घेत तातडीने दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश दिले व त्वरित कार्यवाही करण्यास सांगितले.त्याप्रमाणे आज या सर्व धोकादायक वळणांवर वेगवेगळे सहा दिशादर्शक फलक लावण्यात आले. याबाबत स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी शाखा अभियंता श्री लोहार यांचे देखील आभार मानले.