बांदा (मंगल कामत) २९ जून २०२४
विज्ञान युगातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च शिखरे सर करावीत ; निवृत्त प्राचार्य भिकाजी धुरी यांचे आवाहन
शालांत परीक्षेत मडूरा हयस्कुलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. आधुनिक काळातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अतिउच्च शिखरे सर करावीत. प्रशासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्न करावेत. यश प्राप्तीनंतर गावाकडे वळून पहावे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ निवृत्त प्राचार्य भिकाजी धुरी यांनी व्यक्त केले.
मडुरा हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून श्री. धुरी बोलत होते. व्यासपीठावर शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, कृषी विद्यालयाचे प्राचार्य समीर कोलते, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष रोहिणी गावडे, मडूराम माजी उप सरपंच विजय वालावलकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सायली परब आदी उपस्थित होते.
यावेळी उदय धुरी म्हणाले, ग्रामीण आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही बाह्य मार्गदर्शनाशिवाय ९५ टक्के प्राविण्य मिळवणे हेच मुळात ग्रामीण भागासाठी भूषणावह आहे. सुरेश गावडे म्हणाले, माध्यमिक शाळेत यशस्वी झालेले आपले विद्यार्थी पुढे कॉलेजमध्ये ही चमकले पाहिजेत. त्यांनी पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले.
मडुरा हायस्कूलमधील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी मानस समीर कोलते, ऋतुजा ज्ञानदेव नाईक, विनीत रवींद्र पंडित, ऋषिकेश पंडित व जान्हवी वसंत पंडित यांना सन्मानित करण्यात आले. रिद्धी बाळकृष्ण मडुरकर हिने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायली परब, सूत्रसंचालन सुरेश सावंत तर सुहास वराडकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.