चौघांविरोधात गुन्हा दाखल | जमीन जागेच्या वादातून घडला प्रकार….
सिंधुदुर्ग : वादग्रस्त जमिनीत कुंपण घातल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एकाच कुटुंबातील तिघा सदस्यांना चौघांकडून मारहाण झाली. ही घटना आज सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास आंबोली-बाजारवाडी येथे घडली. याबाबत जखमी दत्ताराम रामचंद्र कर्पे (४०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यात आपल्यासह आई व वहिनीला शिवीगाळ करून दगडाने मारहाण करण्यात आली. तसेच कुत्रा अंगावर सोडल्याने त्याने चावा घेऊन दोघांना गंभीर दुखापत केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार विनोद विजय जाधव (३९), विजय कृष्णा जाधव (६४), सुधाकर कृष्णा जाधव (५९) व विद्या जाधव या चौघांवर आंबोली दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी दिली.
कर्पे यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, विरोधक आणि आपल्या जमीन जागेचे वाद सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आपल्या शेत घराशेजारी विरोध दगडी कुंपण उभारत होते. यावेळी मी आणि माझे घरातील सदस्य त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो. त्याच वेळी त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सुरू असलेले काम रोखण्यासाठी मी पुढे गेलो असता त्यांनी हाताच्या थापटांनी व दगडांनी माझ्यासह परिवारातील सदस्यांना मारहाण केली. तसेच आपला कुत्रा आमच्या अंगावर सोडला. यावेळी त्याने चावा घेऊन दोघांना गंभीर दुखापत केली, असे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसात चौघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.




