‘अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स ‘चे ग्रँड ओपनिंग ; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी (प्रतिनिधी)दि २४ मार्च २०२४
‘अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स ‘च्या माध्यमातून अन्नपूर्णा कोरगावकर व संतोष कानसे यांनी एकत्रित येत या जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण पाऊल टाकलं आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील युवक युवतींसाठी आयटी सेक्टरचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतातील युवाशक्तीला नवी दिशा देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने महत्वाचं असं पाऊल कोरगावकर व कानसे कुटुंबान टाकलं असून त्यांनी लावलेल्या या रोपट्याचं वटवृक्षात रुपांतर होवो, अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुभेच्छा दिल्या.
माजगाव उद्यमनगर सुरू करण्यात आलेल्या येथे ‘अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स’ या आयटी स्टार्टअपच्या पायलट प्रोजेक्टचे ‘ग्रँड ओपनिंग’ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह श्रीरंग मंजुनाथ आचार्य ( हळदीपूर ), भिकाजी देऊ कानसे, माजी नगरसेविका ॲड. पुष्पलता कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये टॅलेंट आहे.
उच्च विद्य विभूषित झालेली येथील अनेक मुले आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी पुणे मुंबई सारख्या शहरात तसेच देश-विदेशातील अनेक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी जातात. माजगाव येथे सुरू झालेल्या या प्रोजेक्टमुळे येथील मुलांना याच ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळेच त्यांनी उचललेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही मंत्री दीपक केसरकर म्हणाले.
यावेळी अन्नपूर्णा टेक सोर्सच्या सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर, गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे, प्रोप्रायटर ऐश्वर्या कोरगांवकर, सौ.अन्नपूर्णा कोरगावकर यांचे वडील श्रीरंग मंजुनाथ आचार्य ( हळदीपूर ), गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे यांचे वडील भिकाजी कानसे, सावंतवाडीच्या माजी नगरसेविका ॲड. पुष्पलता कोरगावकर, दत्तप्रसाद कोरगांवकर, व्यंकटेश शेठ, अखिलेश कोरगांवकर आदी उपस्थित होते.
आमची मुलं रोजगारासाठी विस्थापित होत आहेत. त्यामुळेच भुमिपुत्रांना रोजगार देण्याचा प्रयत्न ‘अन्नपूर्णा टेक सोर्स व गो सोर्स’घ्या माध्यमातून करत आहोत. आता या स्टार्टअप मध्ये १०० युवक युवतींना संधी देण्यात आली आहे. तरी भविष्यात या प्रोजेक्टच्या माध्यमातून १० हजार युवक युवतींना रोजगार देण्याचा आमचा मानस आहे, असं मत सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केले.
तर माझा जन्म, शिक्षण सावंतवाडीतच झालं. नोकरीसाठी मी मुंबईत गेलो. त्यामुळे रोजगारासाठी येथील मुलांना काय करावं लागतं याची जाणीव होती. यातूनच येथील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून प्रयत्न केला. जिल्ह्यातील गरजूंनी या संधीचा फायदा घ्यावा, असं आवाहन गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे यांनी केलं.
यावेळी माजी नगराध्यक्षा श्वेता शिरोडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत, अजय सावंत, आर्किटेक्ट अमित कामत, ओंकार कलवडे, प्रा. विकास गोवेकर, उद्योजक श्रीकृष्ण काणेकर, रमेश भाट, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत कोरगावकर व कानसे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.





