महाराष्ट्रातल्या भाजपच्या 8 उमेदवारांची नावं समोर; दिग्गज नेते मैदानात उतरणार!
दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या जागांचा आढावा घेण्यात आला.
महाराष्ट्र भाजपच्या वतीने केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 25 जागांचं सादरीकरण केलं गेलं. मागच्यावेळी 2019 मध्ये विजयी झालेल्या 23 आणि गमावलेल्या दोन जागांचं सादरीकरण या बैठकीत करण्यात आलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे हे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमोर महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी सादरीकरण केलं.
महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत 25 जागांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी यादी सादर केली. यातल्या काही नावांची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. आजच्या भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
भाजपच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब
नागपूर- नितीन गडकरी
जालना- रावसाहेब दानवे
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
पुणे- मुरलीधर मोहोळ
सांगली- संजय काका पाटील
भिवंडी- कपिल पाटील
दिंडोरी- भारती पवार
बीड- पंकजा मुंडे





