देवगड रेंबवलीच्या किरण खरात याची भारतीय सैन्यात अग्नीवीर म्हणून निवड
कठोर परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर रेंबवली येथील किरणने केले आपले ध्येय साध्य
देवगड (प्रतिनिधी)दि २७ फेब्रुवारी २०२४
देवगड तालुक्यातील रेंबवली धनगरवाडी येथील किरण संतोष खरात यांची भारतीय सैन्यात अग्नीवीर म्हणून निवड झाली आहे.
कठोर परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते मग आजूबाजूची परिस्थिती कशीही असो हे किरण खरात याने दाखवून दिले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळशी येथे झाले. माध्यमिक विद्यामंदीर कुवळे येथे माध्यमिक शिक्षण घेतले तर महाविद्यालयीन शिक्षण शिरगांव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालय येथे सुरु असतानाच २०२० मध्ये ओरोस येथील सिग्मा करिअर अकॅडमी सिंधुदुर्ग येथे सैनिकी भरतीपुर्व प्रशिक्षण घेतले. एप्रिल २०२३ मध्ये कोल्हापूर येथे भारतीप सैन्य दलातील अग्नीवीर पदासाठी आवश्यक असलेली लेखी परिक्षा आणि डिसेंबर २०२३ मध्ये मैदानी परिक्षा दिली. दोन्ही परिक्षेत उत्तीर्ण होऊन त्याची भारतीय सैन्यदलात अग्नीवीर म्हणून निवड झाली आहे. यासाठी त्याला काका रविंद्र खरात यांचे मार्गदर्शन लाभले तर आई-वडीलांनीही प्रोत्साहन दिले.
किरण खरात याचे देशसेवेचे स्वप्न वयाच्या २१ व्या वर्षी पूर्ण झाले आहे. देशसेवेचे ध्येय, कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीमुळे मिळालेले हे यश तरुणांना प्रेरणादायी आहे. किरण खरात याचे आई-वडील शेतकरी असून आपल्या मुलाच्या भारतीय सैन्यातील निवडीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. शिरगांव दशक्रोशीतील सर्वच स्तरातून त्याच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






