पाहणी करण्यास तीन दिवस तर नुकसान भरपाईस किती दिवस..? विश्वनाथ नाईक यांचा संतप्त सवाल

बांदा : पाडलोस केणीवाडा येथील शेतकरी विश्वनाथ नाईक यांच्या चवळी पिकाचे बुधवारी रात्री गव्यांनी नुकसान केले असून अद्याप वनविभागाचे अधिकारी साधी पाहणी करण्यासाठी सुद्धा आले नाहीत. अधिकाऱ्यांकडून सातबारा व आठ अ कागदपत्रे काढून ठेवण्यास सांगितले जाते. परंतु जर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना तीन दिवस लागत असतील तर भरपाई मिळण्यास किती दिवस लागतील याची काही शाश्वती नसल्याचे शेतकरी विश्वनाथ नाईक यांनी सांगितले.

वनविभाग केवळ पंचनामा करण्यात धन्यता मानत असेल तर आम्हाला अशी भरपाई नको. मात्र आमचे पीक वाचविण्यासाठी रानटी प्राण्यांचा बंदोबस्त करा. जंगलात त्यांना आवश्यक खाद्य सामुग्री तयार करा किंवा रात्रीची गस्त वाढवा. तसा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पोहचवा जेणेकरून निदान वनमंत्री तरी शेतकऱ्यांची दखल घेतील असे सांगत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.