कुणकेश्वर शिवतीर्थावर पर्यटकांची गर्दी 

157

कुणकेश्वर शिवतीर्थावर पर्यटकांची गर्दी 

देवगड (प्रतिनिधी)

२६,२७,२८ जानेवारी अशी तीन दिवस सलग सुट्टी असल्याने श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे पर्यटक भाविकांनी गजबजून गेलेले पहा मिळाले.

 

आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेले धार्मिक पर्यटन स्थळ म्हणजे श्री क्षेत्र कुणकेश्वर.या कुणकेश्वर धार्मिक पर्यटन स्थळी येण्यासाठी अनेक पर्यटन भाविकांची पावले वळतात.

मात्र नोकरी व उद्योग व्यवसायामुळे सर्वच पालक वर्गांना हे शक्य होत नसल्याने ते सुट्टी कधी मिळेल याची वाट बघत गणिते घालतचं असतात. आणि त्यात जोड सुट्टी मिळाली की, आयोजन होते ते फॅमिली टूरचे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन २७ जानेवारी शनिवार व रविवार २८ जानेवारी अशी तीन दिवस सुट्टी मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, राजस्थान, आदी भागातील पर्यटक कुणकेश्वर मध्ये सुट्टीच्या निमित्ताने दाखल झाले होते.

पर्यटक भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे तीन दिवस श्री क्षेत्र कुणकेश्वर शिवतीर्थ गजबजून गेले होते .
कुणकेश्वर मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवालय समितीच्या नियमावलीनुसार वस्त्रसंहिता लागू केल्याने तोकडे कपडे, तसेच हाफ पॅन्ट परिधान करणाऱ्या पुरुष मंडळींना देखील मंदिरातील पारंपरिक वस्त्रे दिली जात होती. ती वस्त्र परिधान करूनच त्यांना दर्शनासाठी मंदिरात सोडले जात होते.


कुणकेश्वरला येणाऱ्या असंख्य भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गाड्या पार्किंग केल्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना वाहन चालकांना अडथळा निर्माण होत होता.
कुणकेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या, येणाऱ्या शैक्षणिक सहली, आणि वाढणारी वाहतुकीची संख्या लक्षात घेता. याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणात होत असल्याने या ठिकाणी शनिवार व रविवार या दिवशी पर्यटकांची गजबज मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्यात यावा अशी मागणी येथील जनतेतून, होत आहे.