मळेवाड येथे किराणा दुकानातला आग लागून सुमारे पाच लाखापेक्षा जास्त नुकसान
सावंतवाडी (प्रतिनिधी)
मळेवाड जंक्शन येथील किराणा मालाचे व्यापारी बाबू (दादा) बाळकृष्ण नाईक यांच्या मालकीच्या किराणा मालाच्या दुकानाला मंगळवारी रात्री ११:३० च्या दरम्याने आग लागून दुकान पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. साडे चार ते पाच लाख रुपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मळेवाड जंक्शन येथे बाबू नाईक यांच्या मालकीचे किराणा मालाचे दुकान आहे,नेहमी प्रमाणे रात्री १० वाजता दुकान बंद करून घरी गेले.मंगळवारी रात्री ११:३० च्या दरम्याने दुकानाच्या दिशेने मोठा आवाज त्यांच्या कानी पडला असता त्यांनी बाहेर येऊन बघितले तर दुकानातून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानाचे शटर उघडले असता आग पेटत असल्याचे दिसले. घरातील इतर लोकांना याची कल्पना दिली, ८-१० माणसांच्या जमावाने पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली, आग पूर्णतः विझल्याचे दिसताच रात्री तीन वाजता घरी गेले. पहाटे ५ च्या दरम्याने पुन्हा आगीने पेट घेतला, सदरची आग लागल्याचे उशिरा कळाल्याने दुकान पूर्ण जळून खाक झाले. दुकानामध्ये असलेल्या तेल व डालडा याने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. सदरची आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक अंदाज आहे. मळेवाड तलाठी अनुजा भास्कर यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. मळेवाड कोंडूरे सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे ,जिल्हा बँक संचालक महेश सारंग,तालुका व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पुंडलिक दळवी, बाळा बोर्डेकर,जगदीश मांजरेकर तसेच यांनी भेट देऊन विचारपूस केली.





