तळेरे- वैभववाडी – गगनबावडा – कोल्हापूर मार्ग(करुळ घाट ) 22 जानेवारीपासून ते 31 मार्च पर्यंत बंद
पूर्णवेळ वाहतूकीकरिता रस्ता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले जारी ;पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन
कणकवली(प्रतिनिधी)
तळेरे- गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 जी च्या करूळ घाटातील 5 किमी भागात दुपदरीकरणाचे काम दिनांक 15 जानेवारी पासून ते 31 मार्च 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. या करुळ घाटात एकेरी वातहूक चालू ठेवणे शक्य नसल्याने या भागात काम सुरु असताना पूर्ण वेळ वाहतूक सुरु ठेवणे शक्य होणार नाही व ते धोकादायक ठरणारे आहे. तसेच डोंगराकडील बाजूचे रुंदीकरण, दरीकडील बाजूस संरक्षक भिंत बांधणीचा विचार करता चालू कामामध्ये एकेरी वाहतूक ठेवणेही सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होणार आहे. तरी करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस काम करताना विना अडथळा होण्याकरिता दिनांक 15 जानेवारी ते 31 मार्च 2024 या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र 166 जी वरील सर्व प्रकारची वाहतूक पुर्णवेळ पूर्णतः बंद करून पुढीलप्रमाणे उपलब्ध पर्यायी मार्गावरुन वळविण्यात आली असून या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तळेरे – फोंडा घाट – राधानगरी – ठिकपुर्ली – कळंबा – कोल्हापूर
123.00 कि.मी.,तळेरे – भुईबावडा – गगनबावडा – कळे- कोल्हापूर (प्रवासी वाहतूक )107.00 कि.मी.,तळेरे – वैभववाडी – उंबर्डे- तळवडे अनुस्कुरा – वाघव- केर्ले- कोल्हापूर (प्रवासी व अवजड वाहतुक)128.00 कि.मी.,तळेरे – वैभववाडी – अनुस्कुरा – वाघवे – केर्ले – कोल्हापूर 129.00 कि.मी. असे पर्यायी मार्ग आहेत.
करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रदिवस काम करताना विना अडथळा होण्याकरीता तळेरे- वैभववाडी – गगनबावडा – कळे – कोल्हापूर या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक दिनांक 22 जानेवारी ते दिनांक 31 मार्च 2024 या कालावधीत पूर्णवेळ वाहतूकीकरिता बंद करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी जारी केले आहे.
कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी मोटार वाहन कायदा 1988 कलम 116 नुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हें लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याची किंवा उभारण्याची कार्यवाही करावी, असे जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी आदेशित केले आहे.






