मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अदाणी उद्योग समूहाचा उलट्या दिशेने सुरू असलेला प्रवास अजूनही थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत. Hindenburg Research नं अदाणी उद्योग समूहावर बाजारातील व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवल्यानंतर अदाणी उद्योग समूहाची पत ढासळतानाच दिसत आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदाणी उद्योग समूहाला एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. हा आकडा त्यांच्या एकूण संपत्ती मूल्याच्या जवळपास ५० टक्के इतका आहे.
शुक्रवारी शेअर बाजार उघडल्यानंतर अदाणी समूहाच्या १० कंपन्यांचे शेअर्स आधीच्या दोन दिवसांप्रमाणेच गटांगळ्या खाताना दिसले. त्यामुळे अदाणी उद्योग समूहाच्या एकूण नुकसानाचा आकडा आता ११८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. आज अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स तब्बल २५ टक्क्यांनी खाली उतरले.





