‘जय जवान… जय किसान.!’, घोषणांनी सिंधुनगरी दुमदुमली.! ; आंबा, काजू बागायतदार शेतकर्‍यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण.

38

सिंधुदुर्गनगरी : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना तसेच २०१४ पासून खावटी, मध्यम व अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा, २०२२-२३ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी आंबा बागायतदारांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई मिळावी, आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकर्‍यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करीत लक्ष वेधले. यावेळी ‘जय जवान… जय किसान.!’, ‘बळीराजाचा विजय असो.!’ आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता.

महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाखापर्यंत चे कर्ज शासनाने माफ केले आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम पाहता २ लाखापेक्षा जास्त कर्ज दिसते अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. हे शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित राहिले आहेत. तसेच शासनाने खावटी कर्जाचा विचार कर्ज माफी साठी केला आहे. मात्र मध्यम व अल्प कर्जाबाबत कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना तसेच २०१४ पासून खावटी, मध्यम व अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, २०२२-२३ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी आंबा बागायतदारांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई मिळावी तसेच गेल्यावर्षी कोळी रोगामुळे सुपारी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या नुकसानीचे पंचनामे होऊनही त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे याकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी
उपोषण केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी आग्नेल फर्नांडिस, संदीप देसाई, संतोष पेडणेकर, महेश चव्हाण, अर्जुन नाईक आदी सहभागी झाले होते.