‘कुणबी राजा जागा हो..!’, कुणबी बांधवांचा एल्गार! ; हजारोंच्या संख्येने रोहा प्रांत, तहसील कार्यालयावर समाज बांधव धडकले, १०० टक्के दाखले मिळालेच पाहिजे, एकच गर्जना.

22

रोहा : शशिकांत मोरे

जन्माने, कर्माने कुणबी असणाऱ्यांना कुणबी जातीचे दाखले मिळालेच पाहिजे. १९६७ची जात पडताळणी जाचक अट रद्द करून १९९५, २०००चा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा. कुणबी दाखले मिळावेत यांसह नेते श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला शासनाने १ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा. जात जनगणनेतून कुणबी समाजाचा आर्थिक स्थर स्पष्ट करावा अशा न्याय्य मागण्यांसाठी रोहा तालुका कुणबी समाजाच्या वतीने गुरुवारी दणदणीत मोर्चा काढण्यात आला. कुणबी राजा जागा हो, कुणबी समाजाचा विजय असो, १०० टक्के दाखले मिळालेच पाहिजे, अशी एकच गर्जना संबंध तालुक्यात ऐकायला मिळाली. सकाळी शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह समोरील भव्य प्रांगणात तालुक्यातील हजारोंच्या संख्येने कुणबी बांधव, भगिनींनी सहभाग घेतला. त्यानंतर घोषणा देत, भगवामय होत मोर्चा तहसील, प्रांत कार्यालयावर धडकला. मोर्च्यात कुणबी बांधवांची ऐतिहासिक लाट उसळली. पाच दशके दुर्लक्षीत झालेल्या कुणबी दाखल्या प्रश्नांबाबत कुणबी समाज अधिक आक्रमकतेने व्यक्त झाला. अखेर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत शासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, नागपूर येथे अधिवेशन चालू आहे, गुरुवारी दुपारनंतर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली, त्याचवेळी उत्तर रायगड मुख्यतः रोहा तालुक्यात वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या कुणबी समाजाच्या दाखल्यांसाठी विरार मोर्चा काढण्यात आला. याबाबत आतातरी मोर्च्याची दखल घेत संबधीत लोकप्रतिनिधी विधिमंडळात यावर लक्षवेधी मांडण्यात येते का ? हे पाहावे लागणार आहे, तर कुणबी दाखले जात पडताळणी बाबत भविष्यात कुणबी समाज अधिक कितपत आक्रमक होतो ? हे समोर येणार आहे.

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा संलग्न रोहा शाखा आयोजित कुणबी समाजाच्या प्रलंबित जात पडताळणी दाखल्यांच्या प्रश्नासाठी गुरुवारी कुणबी समाजाचा विराट मोर्चा तहसील, प्रांत कार्यालयावर धडकला. न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कुणबी समाज जिल्हा समन्वय अध्यक्ष ज्ञानदेव पोवार, ज्येष्ठ नेते शंकराव म्हसकर, अध्यक्ष शिवराम शिंदे, शंकरराव भगत, सुरेश मगर, आनंद थिटे, शिवराम महाबळे, सतीश भगत, अमित मोहिते, महेश बामुगडे, संजय मांडलुस्कर, रमण कापसे, शशिकांत कडू, रामचंद्र सकपाळ, महेंद्र पोटफोडे, विष्णू लोखंडे यांसह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो कुणबी बांधव एकटवले. अतिशय शांततेच्या मार्गाने शासनाचे लक्ष वेधणारा मोर्चा असेच वर्णन झाले. रोहा शहरातून तहसील कार्यालयाकडे मोर्चाने कुच करून प्रांताधिकारी, तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. कुणबी समाजाचा विजय असो, कुणबी राजा जागा हो, उठ समाजाचा धागा हो, १९६७ची जातपडताळणीची जाचक अट रद्द झाली पाहिजे, १०० टक्के दाखले मिळालेच पाहिजे. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी यापुढे कोणी कुंणब्यांच्या शेपटीवर पाय दिला तर जसाच तसे उत्तर देऊ, शासनाने नवे अध्यादेश काढून जाचक अट रद्द करून दाखले द्यावेत, अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन उभे करू, याची दखल शासन, लोकप्रतिनिधींनी घ्यावी असा ईशारा पोवार यांनी दिला. यावेळी शंकरराव म्हसकर, सुरेश मगर, शंकरराव भगत, शिवराम शिंदे, अनंता थिटे यांची आक्रमक भाषणे झाली. दरम्यान, न भूतो न भविष्याती असा मोर्चा कुणबी समाजाने काढत ताकद दाखवून दिली. कुणबी बांधवांसह हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. १९६७ ची जातपडताळणी अट रद्द करण्याच्या प्रमुख मागणीने कुणबी समाजाने भव्य मोर्चा काढत शासनाची झोप उडविली, आता संबधीत लोकप्रतिनिधी, सरकार सहभागी आमदार मंत्री अदिती तटकरे कुणबी समाजाच्या न्याय्य मागण्यांची दखल घेत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करतात का, महत्त्वाच्या मागण्यांसाठी कुणबी समाज भविष्यात अधिक काय पाऊले उचलतो ? हे अधोरेखीत होणार आहे.