आरोग्य मंत्री म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अन् शासन म्हणजे ‘असंवेदनशीलतेचा कळस.!’ – डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे सत्ताधार्‍यांवर टीकेचे षटकार.

29

सावंतवाडी : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अतिशय दयनीय अवस्थेत असून त्यावर सत्ताधारी पक्षाचे आरोग्य मंत्री यांनी अतिशय केविलवाणे विधान केलं आहे. ते स्वत: डॉक्टरेट लावतात अर्थात त्यांनी पी.एच.डी. संपादन कशी केली असावी? हा देखील अत्यंत संशोधनाचा विषय आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात रिक्त पदे निम्म्यापेक्षा अधिक आहेत. इथली आरोग्य यंत्रणा व्हेन्टीलेटरवर आहे. इथली आरोग्य व्यवस्थाप कोलमडून पडली आहे, असे विधान उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पुढे सांगितले की, सद्या विधानसभेचे नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान कणकवली मतदार संघाचे आमदार आणि सावंतवाडीचे आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारणार, असे आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. मात्र असे किती दिवस इथल्या गरीब रुग्णांनी फक्त आश्वासनांवर जगावे.?

दरम्यान, मंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली. त्याचाही डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी खरपूस समाचार घेतला.