सातत्याने होणाऱ्या अन्यायामुळे ज्यू बनलेत कणखर.! – निळू दामले. ; २६/११ च्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात ज्यू व्यक्तीही होत्या टार्गेटवर.!, ‘इस्त्रायल व पॅलेस्टाईन – न संपणारा संघर्ष’ विषयावर सावंतवाडीत व्याख्यान संपन्न.

35

सावंतवाडी : जगातील ज्यू लोकांवर सातत्याने अन्याय – अत्याचार होत आले आहेत, त्यामुळेच ते लोक कणखर आणि बुद्धिमान बनले आहेत. जगभरातील यशस्वी शास्त्रज्ञ आणि उद्योजक ज्यू लोकं आहेत. मात्र असे असले तरी अद्यापही त्यांच्याविषयी जगभरात देशाचे आणि संशयाचे वातावरण आहे. २६/११ चा मुंबईचा दहशतवादी हल्ला हा कसाब व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेला हल्ला यामागे केवळ मुंबई हे एकमेव कारण नव्हते, तर तेथे वास्तव्यास असलेल्या दोघा ज्यू व्यक्तींवर सुद्धा हल्ला करण्यासाठीचा हा कट होता, असेही विधान ज्येष्ठ लेखक, पत्रकार तथा आंतरराष्ट्रीय विषयाचे विश्लेषक निळू दामले यांनी सावंतवाडी येथे केले. सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरात ‘इस्रायल व पॅलेस्टाईन : न संपणारा संघर्ष’ या विषयावर त्यांनी पुष्प गुंफले. यावेळी विचारमंचावर श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर उपस्थित होते.

यावेळी आपल्या व्याख्यानात निळू दामले यांनी इस्रायलचा पूर्व इतिहास, अरब राष्ट्रांचा पॅलेस्टाईनला विशिष्ट परिस्थितीत निर्माण झालेला पाठिंबा याविषयी सविस्तर माहिती दिली. गाजा पट्टीतील पॅलेस्टिनी रहिवाशांना इस्रायल धाक दाखवून हुसकावून लावत आहे. आपल्या दडपशाहीने ते आपल्या समाजाच्या वसाहती तेथे वाढवत आहेत.  हाकललेले पॅलेस्टाईन रहिवासी इजिप्त व अन्य शेजारी देशात अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. एकूणच संपूर्ण जगात इस्रायली नागरिकांबाबत अमेरिका युरोपातही सौहार्धाची भावना नाही. युद्धात व संघर्षात अमेरिका व युरोपीय राष्ट्रे पाठिंबा मदत देऊन इस्त्रायल विजयी झाला, तर अप्रत्यक्षपणे समाधान मिळवत असले. तरी यामागे त्यांचे कुट राजकारण आहे. मध्यपूर्वेतील तेलावर त्यांचा डोळा असल्यामुळे ते इस्रायलला पाठिंबा देत आहेत. इस्त्रायलमधील ज्यू  लोकांबाबत अमेरिका आणि युरोपातील ख्रिश्चन लोकांमध्ये प्रचंड द्वेष आहे. मात्र मध्यपूर्वेतील तेलावर त्यांचे विशेष लक्ष असल्यामुळे अरब राष्ट्रांना शह देण्यासाठीच त्यांना इस्त्रायलची गरज भासते. अरब राष्ट्रांनाही पॅलेस्टाईनबाबत फारसा कळवळा नाही. कारण पॅलेस्टाईनची हमास संघटना मुस्लिम ब्रदरहुडची उपशाखा आहे. मुस्लिम ब्रदरहुडला अरब देशांचा विरोध आहे. कारण यांना लोकशाही मान्य नाही. एकूणच अशा मोठ्या राष्ट्रांच्या कुरघोडीमुळे इस्त्रायल – पॅलेस्टाईन हे दोन्ही देश कात्रीत सापडले आहेत, असेही दामले यांनी स्पष्ट केले.

व्याख्यात्यांचा परिचय व सूत्रसंचालन संस्थेचे संचालक राजेश मोंडकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत ॲड. संदीप निंबाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रुपेश पाटील यांनी केले.